पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/147

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भिक्षाटन करणारा. हा समाज तीन दगडांच्या चुलीवर आपली भाकरी भाजतो. तीन थामल्यांवर (काठ्या) उभ्या केलेल्या पालात राहतो. पालाच्या वेशीवर त्यांच्या अस्मिता नि अस्तित्वाच्या अभिमान नि अभिवादनाचे झेंडे रोवलेले असतात. कधी काळी भीक मागून जगणारा हा समाज आज भंगार गोळा करून जगतो. 'हाय का रद्दीऽ, प्लॅस्टिकऽ s लोखंड ऽ' म्हणून पुकारा करत कधी काळी खंदाडी (मोठी झोळी) खांद्यावर लटकावून कागद, काच, कपडे, कचरा यातून विक्री योग्य वस्तू गोळा करून जगणारा हा समाज। गाई-गुरं सांभाळणारा गुराखी 'गोस्वामी' म्हणून ओळखला जायचा. त्याची एके काळी समाजात मोठी प्रतिष्ठा होती. कुंभमेळ्यात श्रेष्ठी म्हणून मिरवणारा हा वर्ग आज उकिरडा उपसून जगतो, हे त्यांच्या कर्माचे फळ नसून समाज उपेक्षेचा परिणाम होय, हे अशोक जाधव यांच्या 'भंगार' ने अधोरेखित केले आहे.

 पत्रा, लोखंड, काच, कागद, कपटे, प्लॅस्टिक गोळा करणारे गोसावी आजच्या समाजातील खरे 'स्वच्छता दूत'. पंचायती, नगरपालिका, महानगरपालिका कचरा उचलून कंपोस्ट खत तयार करतात, तर गोसावी समाज त्यातलं पुनर्प्रक्रियायोग्य (रिसायकल/रिप्रॉडक्शन) योग्य साहित्य गोळा करून पर्यावरण नियंत्रण व स्वच्छ राखण्याचं कार्य करतो हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी डोळे उघडणारा वस्तुपाठ म्हणूनही हे आत्मकथन डोळस ठरतं. उकिरड्यात नको म्हणून समाजाने टाकलेल्या चीजवस्तू गोसावी गोळा करतात व भंगारवाल्याला विकून गुजराण करतात. हे काम गोसावी कुटुंबातील मुलं, मुली, महिला करतात. शिवाय ते घरोघरी, दारोदारी भीकही मागतात. घरचा पुरुष मात्र आयत्या बिळातला नागोबा. तो दारू ढोसत, जुगार खेळत आयुष्य काढतो. भंगारातून आलेल्या पैशातून छाटण, मस्कांड (खाटक्याकडे विकलं न जाणारं) म्हणजे मटण आणायचं. ते बायका, पोरांच्या श्रमातलं. दारू ढोसायची, छाटण-मस्कांडावर आडवा हात मारायचा नि चढली की हे सगळं आणून देणाऱ्या बायका-पोरांनाच शिवीगाळ करत झोडपायचं हा या समाज पुरुषांचा रोजचा पुरुषार्थ नि दिनक्रम!

 सूर्य उगवण्याआधी उकिरड्यावर उगवणारी गोसावी माउली नि तिची लेकरं दिवस बुडेपर्यंत कचरा कुंड्या चिवडत राहतात. अंग अक्षरशः कुजतं ते कुत्री, डुकरांच्या तावडीतून जगण्याची शिदोरी गोळा करताना. अशा स्थितीत अशोक बापाकडे 'मे साळा शिकवारो' (मी शाळेत शिकणार!)

वाचावे असे काही/१४६