पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असायची. उर्दू भाषांमधील या कथांची भाषांतरे कोणत्याही भाषांत होवोत, पण मंटोचं सामर्थ्य असतं ते कथा प्रसंगांच्या गुंतागुंतीत पात्रांच्या, चरित्रांच्या मानसिक गुंत्यात. ते तुम्हाला पकडता येणं महत्त्वाचं. ही अवघड कला अन्य कथाकारांना आव्हान वाटायचं. म्हणून स्पर्धक कथाकार मंटोपुढे हात टेकायचे. हिंदी कथाकार उपेंद्रनाथ अश्कांना तर 'दुश्मन' वाटायचा. मंटोचं खरं कथा कौशल्य आजमावायचं तर त्यांच्या लघुत्तम कथा वाचायला हव्यात. त्या 'स्पाह हाशिए' कथासंग्रहात वाचण्यास मिळतात. मंटोने आपल्या पडत्या काळात पोट भरण्यासाठी म्हणून नाटकं, श्रुतिका, एकांकिका लिहिल्या पण त्यात कथाकार मंटोची म्हणून ओळख असणारी 'नाही रे' वर्गाची, वंचितांची व्यथा नि वेदना अपवादाने अनुभवायला मिळते. मंटोच्या कथा म्हणजे माणसाचं सांगता नि सोसता न येणारं कारुण्य असतं.

 सादत हसन मंटोचं नि महाराष्ट्राचं जिवाभावाचं नातं आहे. सन १९३७ च्या दरम्यान मंटो पटकथाकार म्हणून मुंबईत होते. त्या काळात त्यांच्या कथांवर बेतलेले 'अपनी नगरिया', 'उजाला', 'चल चल रे नौजवान','आगोश', 'आठ दिन' सारखे हिंदी चित्रपट बाँबे टॉकीज, सरोज मूव्हीटोन, इंपिरियल फिल्मने काढले होते. मंटोचे एक 'कोल्हापूर कनेक्शन' मला माहीत आहे. मराठीतील प्रख्यात पहिले ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर जसे आंतरभारती लेखक होते, तसे आंतरभारती पटकथाकारही. सुमारे दोन एक डझन त्यांचे चित्रपट आहेत. ते मराठीशिवाय हिंदी, तमिळ नि तेलुगूमध्येही आहेत. पैकी सन १९४० साली प्रकाशित झालेला 'धर्मपत्नी' सिनेमा फेमस फिल्मसाठी चक्रपाणी यांनी निर्मिला होता. हंस पिक्चर्ससाठी याचं बरंचसं चित्रीकरण कोल्हापूर परिसरात झालेलं आहे. मूळ योजनेनुसार हा चित्रपट हिंदी, मराठी, उर्दू, गुजराती, तेलुगू अशा पाच भाषांत निघायचा होता. त्यातील मराठीची जबाबदारी भालजी पेंढारकरांवर सोपविण्यात आली होती. पैकी उर्दूची भाषांतरित पटकथा तयार करण्याची जबाबदारी उर्दू साहित्यिक अहमद नदीम कासमी यांच्यावर सोपविण्यात आली होती. दिल्लीच्या चावडी बाजार परिसरातील अल्ट्रा मॉडर्न सिनेमाच्या चौथ्या मजल्यावर खांडेकरांच्या 'धर्मपत्नी' पटकथेच्या उर्दू भाषांतराचे कार्य कासमी करीत व ते टाइप करण्याचे काम सादत हसन मंटो करीत. पुढे असे झाले की या उर्दू पटकथेची अनेक दृश्ये व संवाद मंटो यांनी उत्स्फूर्तपणे स्वतः भाषांतरित करत टाइप केली, इतके मंटो या पटकथेशी एकरूप झाले होते. पण दुर्दैवाने हा चित्रपट फक्त तेलुगू व तमिळमध्येच

वाचावे असे काही/१३२