पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाजाच्या रूढ कल्पनांविरोधी तो कथा लिहीत राहिल्याने कायम वादग्रस्त राहिला. 'काली सलवार', 'बू', 'ठंडा गोइत', 'धुआँ', 'खोल दो', 'ऊपर', 'नीचे और दरमियान' या त्याच्या कथांवर वाद होऊन खटले भरवण्यात आले तरी त्यांनी हार न मानता आपल्याला जे पटलं तेच लिहिलं. सन १९८४-८५ च्या काळात माझ्या मानगुटीवर मंटोचं भूत बसलं होतं. त्या काळात मी 'पैस' मासिकासाठी 'काली सलवार'चा अनुवाद केल्याचं आठवतं. मंटो हा जगातला एकमात्र कथाकार असावा की ज्याने मृत्यूपूर्वी आपल्या कबरीवरच्या शिलालेखावर काय कोरलं जावं हे लिहून ठेवलं होतं. विशेष म्हणजे लाहोरच्या मियाँ साहब कब्रस्तानमधील कबरीवर ते आजही आपणास वाचता येतं. ते असं - "इथे सादत हसन मंटोला दफन करण्यात आले. त्याच्या हृदयात कथालेखनाचे सारे गुण नि रहस्यं सामावलेली होती. तो अजूनही या कबरेखाली असा विचार करत पहुडलेला आहे की तो श्रेष्ठ कथाकार होता की परमेश्वर!" त्याचा मात्र अजून निर्णय होऊ शकलेला नाही.

 'मंटो की श्रेष्ठ कहानियाँ' मधील पहिली कथा 'तमाशा' हीच मंटोने लिहिलेली पहिली कथा होय. ती अमृतसरच्या साप्ताहिक 'खल्क' (निर्मिती) मध्ये प्रकाशित झालेली होती. यापूर्वी मंटोनी अनुवादक म्हणून मोठं लेखन केलं होतं. अनेक रशियन कथांची त्यांनी भाषांतरे केली होती. व्हिक्टर ह्यूगोची भाषांतरित कादंबरी 'सरगुजश्त-ए-असीर' उर्दूत प्रसिद्ध आहे. मंटोनी सॉमरसेट मॉम वाचलेला होता. त्याच्या कथांचा प्रभाव मंटोवर दिसतो. 'धुआँ', 'काली सलवार', 'हतक', 'ठंडा गोइत', 'बू' अशा या संग्रहातील कथा अश्लील म्हणून वादग्रस्त ठरल्या होत्या. पण आज त्या स्त्रीमुक्तीच्या मानल्या जातात. कथेमध्ये वेश्या जीवनाचं सूचक चित्रही त्या वेळी अश्लील मानलं जायचं. मंटो मात्र वेश्यांना 'माणूस' म्हणून पाहायचा. सामाजिक व्यवस्थेचं वास्तववादी चित्रण करणाऱ्या कथा म्हणून सदर संग्रहातील 'टोबा टेक सिंह', 'नया कानून', 'खोल दो' महत्त्वाच्या ठरतात. या संग्रहातील 'हतक'ची नायिका सुगंधी नि काली सलवार'ची सुल्ताना, 'टोबा टेक सिंह'चा पागल सिक्ख, 'नया कानून'चा मंगू कोचवान आपण कधीच विसरू शकत नाही, कारण त्यांचं जगणं, झगडणं कालातीत असतं म्हणून. मंटोच्या कथांचा अंत चकवा देणारा असायचा तसा सूचकही. त्यांच्या कथात हिंदू-मुस्लीम पात्रांमधील आत्मीय संबंध केवळ धार्मिक एकता नसायची तर मानवीय नाते संबंधांची ती एक न उकलणारी रेशमी लड

वाचावे असे काही/१३१