पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिला. अक्षर, चित्र, शिल्प, आकृती, लिपी सारे घटक वाचनास संपृक्त व संपूर्ण करतात. अक्षरंच नाही वाचायची, चित्रही वाचता आली पाहिजे. चित्र, शिल्प, आकार, भावभंगिमा वाचता आली की देहबोलीचं ज्ञान येतं. मग आपण माणूसही वाचू शकतो. आज निसर्ग वाचन, जंगल वाचन असे शब्द कानी पडतात. तेव्हा वाचन विकासाच्या पाऊलखुणा लक्षात येतात. वाचलेलं विश्लेषित करता येणं ही वाचनाची उच्च कोटी म्हणायची. पण सर्वोच्च वाचन कल्पना, तर्क, तत्वज्ञान, नव ज्ञानविज्ञानास जन्माला घालत असतं हे आपणास विसरून चालणार नाही.

 वाचन कृती आहे, कला की विज्ञान याबाबत विचार करताना असे लक्षात येईल की प्रारंभी ती एक वाचिक कृती होती. पण नंतरच्या काळात वाचन प्रभावी करण्याच्या दृष्टीने विचार सुरू झाला. वाचनात हस्व-दीर्घ उच्चारण, आरोह-अवरोह, विराम यांचं असणारं असाधारण महत्व उमगतं ते आदर्श अभिवाचनातून. यातून मग वाचन कला विकसित झाली. वाचन कला दृष्टी, ध्वनी नि वाचा यांचा त्रिवेणी संगम होय. ही एक अंतर्क्रिया असून तीसाठी तादात्म्याची गरज असते. एकाग्रता निर्माण होते ती वाचनाविषयी तुमच्या प्रतिबद्धतेतून. शिवाय आपण जे ग्रंथ वा मजकूर वाचतो त्याच्या आशय, विषयावरही एकतानता अवलंबून असते. वाच्य मजकूर आकर्षक असेल तर अंतर्दृष्टी, (Insight) नि अंतरात्मा (Inner Mind) यांची एकात्मता घडून येऊन वाचन चिरस्मरणीय ठरते. वाचन गतिमानतेने करणे ही एक कला आहे. पण त्यात उरकून, संपवून टाकायचा भाग आला की ते कर्मकांड बनून जाते. आकलनयुक्त वाचन कौशल्य हे तन्मयतेची फलश्रुती असते. गतिमान वाचन कौशल्यामुळे वाचक कमी वेळात अधिक वाचू शकतो. आता तर गतिमान वाचनासाठी 'The Read- ers Edge' सारखी सॉफ्टवेअर्स, अ‍ॅप्स विकसित झालीत. वाचन कला सरावाने गतिमान करता येते तशी ती कुशलही बनविता येते. त्यासाठी तुमच्यात वाचनाची आवड नि अभिरूची असणे ही पूर्वअट असते. एकदा का तुम्हाला वाचनाची कला साधली की मग स्थल, काळ, वेळाच्या सीमा ओलांडत कसेही, कुठेही तादात्म्य वाचन करू शकता.

 वाचनावर गतकाळात संशोधन झाल्यामुळे वाचन कलेचे वाचन विज्ञानात रूपांतर होत आहे. विदेशात वाचनाचे अभ्यासक्रम तयार झाले असून वाचन गती, व्याप्ती वाढवणे शक्य झाले आहे. आकलन प्रगल्भ करता येणे शक्य असून विश्लेषण अधिक नेमकेपणाने आता करता येते.वाचनातून

वाचावे असे काही/१२