पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/126

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विज्ञान, गणित, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र इ. विषयक पुस्तकं कशी वाचावी ते सविस्तर सांगतं. त्यासाठीचे स्वतंत्र अध्याय म्हणजे आपल्या आवडीच्या पुस्तक वाचनाचं हे प्रशिक्षणच आहे.

 हे पुस्तक बहुगुणी खरेच. यास जी परिशिष्टे जोडण्यात आली आहेत, ती आपले वाचन समृद्ध तर करतातच शिवाय प्रगल्भ, प्रौढही. म्हणजे असे की एका परिशिष्टात जगभरच्या श्रेष्ठ ग्रंथांची सूची आहे. सुमारे दीडशे ग्रंथांच्या या सूचीच्या कसोटीवर आपण आपल्या वाचनाची प्रत, आलेख, टक्केवारी स्वयंमूल्यमापन करून ठरवू शकतो. दुसऱ्या परिशिष्टात काही चाचण्या आहेत. त्या आधारे वरील चार प्रकारचे वाचन लक्षात घेता त्या श्रेणीतले आपले वाचन तपासता येते. त्यामुळे 'हाऊ टू रीड अ बुक' म्हणजे वाचन संबंधी स्वयंशोध व स्वयंमूल्यमापन ठरते.

 हे पुस्तक वाचत असताना पूर्वी वाचलेले एक पुस्तक माझ्या लक्षात आले. त्या पुस्तकाने मला वाचन हे कला नसून शास्त्र असल्याचं भान दिलं होतं. म्हणजे असे की वाचनाची गती वा वेग असतो. तो मोजता येतो. मोजता येत असल्याने वाढवता येतो. वाढला का ते पाहता येते. वाचकांचे वाचन दोष असतात. ते शोधण्याचे तंत्र, चाचण्या आहेत. हे दोष वाचिक, मानसिक, आकलन विषयक असतात. ते प्रयत्नपूर्वक कमी करता येतात किंवा घालवताही येतात. वाचन पट असतो. म्हणजे दृष्टिक्षेपात येणारी वाचन कक्षा रुंदावता येते. डोळ्याचा आवाका/वाचन क्षमता वाढविता येते. वाचनाची आदर्श पद्धत असते. त्यात बसावे कसे, डोळे व पुस्तक अंतर, पुस्तकाचा कोन, प्रकाश कोणत्या बाजूने हवा, डोळ्यावर प्रकाश का येऊ नये अशा कितीतरी शास्त्रशुद्ध वाचनाचे मार्गदर्शक करणारे अनेक ग्रंथ आहेत.

 जगातल्या अनेक विद्यापीठात पहिलीपासून ते पदव्युत्तर स्तरापर्यंतचे वाचन प्रशिक्षण अभ्यासक्रम आहेत. आपणाकडे याबाबत आपण प्राथमिक विचारही करत नाही. कारण आपण वाचनास अद्याप पोथी वाचन, पारायणच मानतो आहोत. अस्वस्थ करते ते वाचन, विचार करायला शिकवते ते वाचन, विवेक जागवते ते वाचन हे अजूनही आपल्या लेखी नाही. देव व दैव शब्द वाचा. सकृतदर्शनी केवळ एकाच मात्रेचा फरक आहे दोन शब्दात. अर्थात मात्र जमीन आसमानाचे अंतर आहे, हे उमगते फक्त प्रगल्भ वाचनाने.

◼◼

वाचावे असे काही/१२५