पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/125

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपली गाडी पहिल्या फलाटालाच थांबलेली असल्याने आपला प्रगल्भ वाचक म्हणून विकास होत नाही. हे पुस्तक आपणास समजावते की अलीकडे माणसाचे वाचन हे रंजकतेकडून उपयोगितेकडे सरकत आहे. म्हणजे असे की गेल्या शतकात माणसं कथा, कादंबऱ्या, नाटके, निबंध वाचत. आता जगावे कसे? जीवन अनुभव, प्रवास, कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकाससंबंधी वाचणे तो पसंत करतो, कारण वाचन आता वेळ घालवायचे साधन राहिले नसून ते जीवन जगण्याचे मार्गदर्शक झाले आहे. शिवाय रेडिओ, टेलिव्हिजन, मोबाईल, संगणक, सिनेमा इ. रंजन व माहिती संपर्क साधनांमुळे माणूस बाह्यतः कृतिशील निष्क्रिय वाटतो. परंतु त्याचे अंतस्थ निद्रित राहते. परिणामी मन निष्क्रिय होते. मनाचे निष्क्रिय होणे म्हणजे अंतर्विकास थांबणे होय. त्यामुळे आपला बौद्धिक, नैतिक, तार्किक, आत्मिक संघर्ष कमी होऊन आपण स्थितीशील होऊन जातो. माणसाची ही वाढ खुंटणे म्हणजे जिवंत मरण जगणे. ते आपण सध्या जगत असल्याचे भान हे पुस्तक देते.

 'हाउ टू रीड अ बुक' आपणास लक्षात आणून देते की वाचन हे श्रेणीबद्ध असते. वाचन ही कृती तर आहेच, शिवाय ती कलाही आहे. वाचनाची पहिली श्रेणी म्हणजे प्राथमिक वाचन. 'त ला काना ता'. 'कमल नमन कर', 'ग गवत ग' असं वाचणं म्हणजे अक्षर ज्ञान ग्रहण करणं. मग आपण निरीक्षणात/पर्यवेक्षणात वाचू लागतो. प्रगट वाचायचं नि शिक्षक, पालकांनी दुरुस्त करायचं, या श्रेणीत उच्चार, विराम, अनुस्वार, उकार इ. चं भान येऊन ते प्रमाणित होतं. तिसरी श्रेणी असते विश्लेषी वाचनाची. स्वयंवाचन, स्वयंविकास असं या वाचनाचे स्वरूप असतं. पण आपल्या औपचारिक शिक्षणाने या वाचनाला स्मरणातच जेरबंद करून टाकलं असल्याने आपला वाचन विकास खुंटला. वाचनाची चौथी परी म्हणजे सत्यान्वेषी वस्तुनिष्ठ वाचन. ते आपणास चिंतन, मनन, तुलना इ. तून निष्कर्षाप्रत पोहोचवते.

 या पुस्तकाची एक मोठी मदत म्हणजे पुस्तकाची पारख करण्याचं कौशल्य वाचकात निर्माण करते. पुस्तकाचा अभ्यास कसा करावा, ते निवडावे कसे, लेखकाची माहिती, पुस्तकाचा संदेश, समीक्षा, यातून आपलं वाचन वाया जाऊ नये याची काळजी घेणारं हे पुस्तक वाचणं म्हणजे वाचनात वाया जाणाऱ्या वेळेची बचत करायची कला शिकणं होय. आणखी एक गोष्ट अशी की हे पुस्तक आपणास कथा, कादंबरी, साहित्य, इतिहास,

वाचावे असे काही/१२४