पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/111

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आजची महानगरपालिका छ. राजाराम महाराज यांच्या कारकीर्दीत अस्तित्वात आली. त्यांनी कोल्हापूर स्टेट म्युनिसिपल अ‍ॅक्ट - १९२५ मंजूर केला. इतकेच नव्हे, तर आज जिथे महानगरपालिका कार्यरत आहे ती इमारत पूर्वी 'मेरी वेदर बिल्डिंग' म्हणून परिचित होती. तिची उभारणी छ. राजाराम महाराजांनीच केली आहे. आजचे शिवाजी हे टेक्निकल स्कूल जिथे पूर्वी राजाराम सायन्स कॉलेज भरत असे ती बिल्डिंग 'ओब्रायन टेक्निकल स्कूल' म्हणून राजाराम महाराजांनी सन १९२९ मध्ये उभारली. आज आपण राजर्षी शाहू जयंती वा सामाजिक न्याय दिनी दसरा चौकातील राजर्षी शाहू पुतळ्याला अभिवादन करतो, तो शिल्पकलेचा वारसा छ. राजाराम महाराजांनीच निर्माण केला. त्याशिवाय प्रिन्स शिवाजी पुतळा, अक्कासाहेब महाराज पुतळा उभारला. छ. राजाराम महाराजांनी जुनी कोर्ट इमारत (राधाबाई बिल्डिंग) तिथे संस्थानी न्यायालय होते. त्यास हायकोर्टाचा दर्जा छ. राजाराम महाराजांच्या काळात देण्यात आला होता. आणि आज आपण खंडपीठ सुरू करावे म्हणून परत मागणी करीत आहोत, त्याला हा पूर्वेतिहास आहे. लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, साईक्स एक्सटेंशन या नागरी वसाहती राजाराम महाराजांच्या कार्यकाळात पूर्ण झाल्या.

 असा विस्मृतीत गेलेला इतिहास जपण्याचे कार्य हा चरित्र ग्रंथ करतो म्हणून तो सर्वांनी वाचायला हवा. शालिनी पॅलेस ही छ. राजाराम महाराजांचीच देणगी. शिवाजी विद्यापीठाचे स्वप्न त्यांच्याच काळात उदयाला आले. १९३४ साली राजाराम कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या भाषणात तत्कालीन प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांनी ते स्वप्न आपणास दिले. या चरित्रात आपणास त्याचा आराखडा वाचावयास मिळतो. तो आजच्या शिवाजी विद्यापीठ धुरीणांनी मुद्दाम वाचायला हवा तो अशासाठी की विद्यापीठ स्थापनेचा सुवर्णमहोत्सव होऊनही आपण छत्रपती राजाराम महाराज आणि डॉ. बाळकृष्ण यांचे शिक्षण स्वप्न (व्हिजन) गाठू शकलो नाही. (पृ. १६५)

 सदर चरित्र ग्रंथाचे योगदान हे की ते आपणास छत्रपती राजाराम महाराजांच्या ४३ वर्षांचे आयुष्य समजावते. १८ वर्षांच्या राजकिर्दीचा आलेख ते आपणापुढे उभा करते. त्यातून लक्षात येते की राजाराम महाराजांनी आपल्या कारकीर्दीत जीवनाच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श करत या समाजाची घडण जातीय ऐक्याची व धार्मिक सहिष्णतेची बनवली. विशेषतः ग्रामीण भागात प्रत्येक नदीतीरांवर नावेची सोय करून ग्रामीण दळणवळण गतिमान

वाचावे असे काही/११०