पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नियमित राजर्षी शाहू महाराजांना युवराज राजाराम यांची प्रगती कळवीत असत. नि राजर्षी शाहू महाराजही नियमित उत्तरे देत. शंभर वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराज हे सुजाण पालक होते, हे या पत्रव्यवहारातून लक्षात येते. आपल्या मुलाला युवराज म्हणून विशेष वागणूक दिली जाऊ नये, त्याने सर्वसामान्य मुलांमध्ये मिसळावे, खेळावे म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा कटाक्ष वाचला की या रयतेच्या राजाचे खरे मोठेपण, माणूसपण लक्षात येते.

 राजर्षी शाहू महाराजांच्या अकाली निधनाने यूवराज राजाराम यांना सन १९२२ मध्ये संस्थानची धुरा अनपेक्षितपणे स्वीकारावी लागून ते छत्रपती राजाराम महाराज झाले. राज्यकारभाराच्या अवघ्या दीड तपाच्या काळात राजाराम महाराजांनी जे कार्य केले ते आपल्या वडिलांची लोकहितैषी परंपरा वर्धिष्णू करणारे ठरले. आपल्यापैकी फार कमी लोकांना हे माहीत असावे की आजचे कोल्हापूर आकाराला येण्यात छ. राजाराम महाराजांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक सुधारणांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी सत्यशोधक चळवळीचे पुनरुज्जीवन केले. त्याबद्दल त्यांना मानपत्र बहाल करून गौरव करण्यात आला होता. त्यांनी सत्यशोधक समाजाप्रमाणेच आर्य समाजास प्रोत्साहन देऊन सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना एकत्र शिकविण्याच्या प्रयत्नांना बळ दिले. राष्ट्रभाषा हिंदीच्या प्रचार, प्रसारास साहाय्य केले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी अस्पृश्यता निवारणात पुढाकार घेतला. त्याचे ठळक उदाहरण म्हणजे अस्पृश्य जातीतील लोकांसाठी अनिवार्य असलेली हजेरी पद्धत रद्द केली. आज आपल्या महाराष्ट्र शासनाने जात पंचायत प्रतिबंधक कायदा केला म्हणून आपण त्यांचे कौतुक करतो. पण छत्रपती राजाराम महाराजांनी सन १९३९ मध्येच कोल्हापूर संस्थानास 'सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा लागू केला होता. श्री करवीर निवासिनी देवालय (अंबाबाई मंदिर) १९३२ साली अस्पृश्यांना खुले केले होते. जैन, मुस्लीम, ख्रिश्चन धर्मीयांसाठी पण छ. राजाराम महाराज यांनी उत्पन्नवाढीसाठी जागा, कबरस्तानासाठी जागा देऊन आपले पुरोगामीपण पणाला लावले होते.

 स्त्री शिक्षण प्रसारार्थ त्यांनी अनेक शिष्यवृत्ती सुरू केल्या. सन १९२९ मध्ये मुलींसाठी स्वतंत्र शाळा- महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल (म ल ग हायस्कूल) सुरू केले. स्त्रियांना उच्चशिक्षित व मिळवत्या करण्यासाठी लेडी साइक्स लॉ कॉलेज (आत्ताचे बी.टी. कॉलेज) सुरू केले. कोल्हापूरची

वाचावे असे काही/१०९