पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तुम्हास प्रगत, पुरोगामी बनवते ते वाचन समृद्ध! परिवर्तन, कायाकल्प ही वाचनाची खरी कसोटी होय. वाचन विचार-प्रवण असेल तर नुसतं वाचूनही माणूस थकून जातो. ते कष्टप्रद होणं म्हणजे तुम्ही वाचलेल्यावर विचार, चिंतन, मनन करता म्हणून. केवळ वाचिक कसरत वाचन नव्हे. समूहवाचन, प्रकट वाचन पारायण असते. मौन पारायण, आत्मवाचन जितके वेळा तुम्ही कराल तितक्या वेळा ते तुम्हास नवी अनुभूती, जाणीव, विचार देते. म्हणून अभिजात साहित्याचे वाचन कधीच वाचकास समाधान, तृप्तीची ढेकर नाही देत. देतच असेल तर वारंवार वाचनाचा नाद नि छंद!

"प्रसंगी अखंडित वाचित जावे' हा न्याय पाळू तर वाचनाचे रुपांतर वेडात होते. वाचन हा छंद आहे. तो एक नादही! मनात निरंतर रुंजी घालणारं वाचन तुमच्यात वाचन निरंतरता जपतं. जीवनात चतुरस्र वाचनाचं महत्व असाधारण असतं. मुळात विविध ज्ञान-विज्ञाने, विद्याशाखा निर्माण झाल्या त्याच मुळी मानव जीवन सर्वांगी समृद्ध करण्याच्या ध्यासातून. एकाच प्रकारचं वाचन माणसात कंटाळा निर्माण करतं. उलटपक्षी रुचीपालट वाचन तुम्हास नित्य आनंदी, सर्जनशील, नवोपमक्रमी बनवतं. 'पान क्यों सडा? घोडा क्यों अडा?' याचं उत्तर भाकरी करपण्यात आहे. फिरवली नाही, परतली नाही की भाकरी करपते. पानाची चवड बदलत नाही राहिलात की पानं सडू लागतात. घोड्याला पळवलं नाही की त्याचे गुडघे धरतात. वाचनही फिरतं हवं. बहुरस संपन्न, बहुराग केंद्री वाचन वाचकास चिरतरुण बनवतं. आईच्या पोटातील गर्भाप्रमाणे माणसाचा मेंदू चळवळत राहायला हवा. मेंदूच्या घड्या विचार, चिंतन, मनन, निदर्शक असतात म्हणे. मेंदूवरच्या अधिकच्या घड्या बुद्ध्यांक निदर्शक असतात. जितके वाचन अधिक तितक्या घड्या अधिक. 'ज्ञान' हे बहिरागम शिक्षकामुळे शक्य असतं असं सॉक्रेटिसने लिहून ठेवलंय. हा बहिरागम शिक्षक वाचनशील असतो म्हणून त्यात समाजशीलता विकसित झालेली असते. नुसतं वाचन निरुपयोगी. वाचल्याचा परिणाम होऊन तुमचा जीवन व्यवहार बदलला तर ती वाचनाची इतिश्री, फलप्राप्ती समजावी. वाचनाचा वापर त्याचं प्रतिबिंब म्हणजे तुमचा आचारधर्म. 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ' तसं वाचनही व्यर्थ! वापराने विकास व नावापराने -हास हा उत्क्रांतीचा नियम आहे. बैलाचा खांदा मजबूत, घोड्याची छाती दमदार, गाढवाची पाठ वजनदार, एडक्याचे शिंग टणक का विचाराल तर त्याचं रहस्य वापरात सामावलेले तुम्हास आढळून येईल. माणसाची शेपूट झडली, लांब केस आखूड झाले, नखे नाजूक झाली याचं

वाचावे असे काही/१०