पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विचार असं सारं अनुवादून ते विक्रमी वेळात (अवघ्या दहा महिन्यात) आणि घसघशीत १०००-१२०० पानात देण्याचे श्रद्धापूर्व कार्य केले आहे डॉ. नरेंद्र जाधव यांनी. असं सांगितलं जातं की, साने गुरुजींनी महाराष्ट्राला 'आई' दिली. तर डॉ. नरेंद्र जाधव यांनी 'बाप' दिला. 'आमचा बाप आन् आम्ही' हे त्यांचं घरोघरी वाचलं गेलेलं आत्मचरित्र.

 डॉ. नरेंद्र जाधव यांनी 'रवींद्रनाथ टागोर : समग्र साहित्य दर्शन' संच त्रिखंडात उपलब्ध करून दिला आहे. 'भयशून्य चित्त जेथ...' मध्ये रवींद्रनाथांच्या प्रातिनिधिक कवितांचे भाषांतर आहे. 'रवींद्रनाथ टागोर : युगनिर्माता विश्वमानव' या दुसऱ्या खंडात रवींद्रनाथांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा परिचय चिकित्सक पण मर्मग्राही शैली करून देण्यात आला आहे. 'रवींद्रनाथ टागोर : समग्र साहित्यदर्शन' खंडात त्यांच्या ललित व वैचारिक लेखांची भाषांतरे आहेत. त्यात लेख, भाषणे, बालगीते, कथा, कादंबरी, नाटक, प्रहसन, कविता यांपैकी निवडक अनुवाद देण्यात आले आहेत.

 'भय शून्य चित्त जेथ...' हा कविता खंड आहे. यात कवींद्र रवींद्रनाथांच्या स्वदेश, समाज, प्रेम, निसर्ग, भक्ती, मृत्यूविषयक १५१ कवितांचा अनुवाद आहे. या खंडास डॉ. नरेंद्र जाधव यांनी 'रवींद्रनाथांची काव्यप्रतिभा' शीर्षक प्रस्तावना दिली आहे. शिवाय 'रवींद्रनाथांचा राष्ट्रवाद' हा स्वदेश प्रेमविषयक कवितांचा परिचय करून देणारे टिपण आहे. अगदी प्रारंभी त्रिखंडाची समान प्रस्तावनाही आहे. या सर्वांमधून सर्वसामान्य वाचकास रवींद्रनाथ टागोर कळणे सुलभ झाले आहे. या कविता खंडातील १५१ कवितांपैकी २७ कविता 'गीतांजली'मधील असून अन्य १२४ विविध विषयांवरील प्रातिनिधिक रचना होत. या भाषांतर खंडाचे वैशिष्ट्ये म्हणजे मूळ बंगाली अथवा इंग्रजी कविता देऊन शेजारील पानावर मराठी भाषांतर दिले आहे. त्यामुळे 'हा सूर्य, हा जयद्रथ' असा साक्षात्कार घेणे वाचकास शक्य होते. यातील १५ कविता तर अशा की त्या प्रथमच मराठीत भाषांतरित झाल्या आहेत. या कविता वाचताना वाचक स्तिमित होतो. विचार करताना लक्षात येते की रवींद्रनाथांच्या कवितांमध्ये भाव, बिंब, चित्र, संगीत, छंद, नाद, ताल यांची एक सुंदर समा (चिरंतर उत्कृष्टता) निर्माण होते, त्यामागे या कवीचा 'मनुषेर धर्म' सतत जागृत असतो. कवी, गीतकार, टीकाकार, चित्रकार, चिंतक, संगीततज्ज्ञ, निबंधकार, शिक्षक, गायक, भाषाविद्, द्रष्टे रवींद्रनाथ एक होऊन अवतरतात, म्हणून तर इंग्रजी कवी वाय. बी. यिटस्ला

वाचावे असे काही/१०२