पान:वाचन (Vachan).pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सुधारित तिस-या आवृत्तीच्या निमित्ताने
 ‘वाचन' पुस्तकाची पहिली आवृत्ती अकराव्या विश्व हिंदी संमेलनाच्या निमित्ताने मॉरिशसला गेलो असताना तेथील विश्वहिंदी सचिवालयात प्रकाशित झाली. पोर्ट लुईस इथे २२ ऑगस्ट, २०१८ ला हा प्रकाशन समारंभ संपन्न झाला. प्रमुख पाहुणे होते स्वीडनच्या उप्साला विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. हाईन्स वसलर. समारंभात प्रमुख म्हणून उपस्थित होते विश्व हिंदी सचिवालयाचे महासचिव डॉ. विनोद कुमार मिश्र, हंगेरीतील बुडापेस्ट विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. पीटर शानी, गोहत्ती विद्यापीठ, आसामचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. विनोद मैंधी, मिझोरम विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. सुशील कुमार शर्मा यांच्या शिवाय फिजीचे भारतीय उच्चायुक्त शिष्टमंडळासह उपस्थित होते. या पुस्तकाचे मराठी जगतात चांगले स्वागत झाले. त्याचे प्रमुख कारण होते की वाचनाचा शास्त्र म्हणून विचार-विवेचन करणारे हे पहिले पुस्तक ठरले. शिवाय वाचनाच्या शास्त्रीय अंगाने शतकभरात लिहिलेच गेले नव्हते. त्यामुळे पहिली आवृत्ती हातोहात संपली.
 १५ ऑक्टोबर भारतभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा हा जन्मदिन. कोल्हापुरातील वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था, मराठी बालकुमार सभा, अक्षर दालन, सृजन फाऊंडेशन, अन्य अनेक शिक्षण संस्था आणि या पुस्तकाचे प्रकाशक भाग्यश्री प्रकाशन यांनी एकत्र येऊन 'जिल्हास्तरीय प्रगल्भ वाचक स्पर्धा - २०१८' चे आयोजन केले. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर सुमारे १२०० विद्यार्थी बसले आणि दुसरी आवृत्तीही प्रकाशन होताच संपली.