पान:वाचन (Vachan).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विस्तार भिन्न असे ज्ञानाचे रूप आकारते ते सृजनात्मक वाचनाचे फलित असते. ते अनुभव, वाच्य सामुग्री (Text), विश्लेषण, पूर्वज्ञान, आकलन यातून निर्माण होत असते.
  वाचनावर विचार करणा-या अनेक संशोधकांनी चिकित्सात्मक वाचन आणि सृजनात्मक वाचन यांस एकच मानण्याची चूक केली आहे. वस्तुतः चिकित्सक वाचनासाठी निर्णय नि आकलन क्षमतेची गरज असते, तर सृजनात्मक वाचनास कल्पनेची भरारी आणि स्वच्छन्द वैचारिकता आवश्यक असते. सृजनात्मक वाचनाचा विकार लेखन सातत्यातूनही होत रहातो. काय वाचायचे नि काय नाही याची विवेकी निवड ही लेखकाचे अनुभवजन्य कौशल्य मानावे लागेल.
 सृजन ही मूलतः आंतरिक प्रक्रिया होय. ती ज्ञानीच करू जाणे. नव निर्मितीच्या ध्यास नि ध्येयातून सृजन जन्माला येत असते. कलाकार, वैज्ञानिक, संगीतकार, साहित्यिक प्रत्येक जण नवनिर्मिती करीत असला तरी प्रत्येकाचे सृजनात्मक वाचन जसे भिन्न असते तसे माध्यमही. स्वर ताल, रंग, माती, शब्द ही माध्यमे भिन्न. पण वाचन, विचार प्रक्रियेतून त्यातील नवसृजन आकारत असते, हे कोण नाकारेल. 'नवे व्याख्यायित करणे, त्याचे मोजमाप, मूल्यमापन भौतिकशास्त्र होते, तसे ते परिमाणजन्य (Measurable) नसते, तर असते ते परिणामजन्य (Effective). सृजनात्मक वाचन आणि लेखन घडून यायचे असेल तर समाज हा व्यक्तिस्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्याने युक्त हवा. स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, सहिष्णुता, सद्भाव इत्यादी मूल्य व्यवस्थेची कदर करणाच्या समाजातच नवनिर्मितीच्या संभावता असतात, हे आपणास विसरुन चालणार नाही. सृजनात्मक लेखन हे सृजनात्मक वाचन शक्यतेवर अवलंबून असते. जिथे स्वातंत्र्यमूल्य लोपते तिथे सृजन ऱ्हास अटळ असतो.
५.८.२ सृजनात्मक वाचन सोपान (stages of Creative Reading)

 सृजनात्मक वाचन घडून यायचे तर वाचकास वेगवेगळ्या प्रक्रिया नि पाय-या ओलांडाव्या लागत असतात. त्यात दृष्यात्मकता, लेखन प्रकटीकरण, मौखिक वा सांगितिक प्रतिपादन, नाट्यीकरण इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव असतो. दृष्यात्मकता, नाट्यीकरण इ. मधून चरित्र, पात्र समजणे सुलभ असते. त्यातून चरित्र गुण समजण्यास तसेच त्यांचे विश्लेषण, आचरण शक्य असते.

वाचन/८७