पान:वाचन (Vachan).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘जे न देखे रवी, ते देखे कवी'चा बोध म्हणजे सृजनात्मक वाचनाची फलश्रुती होय. लेखकाच्या कल्पना, विचारांशी ताडून वाचक आपलं मत बनवतो. म्हणून वाचन सृजनात्मक (Creative) असल्याचे सिद्ध होतं.
 वरील सर्व प्रकारच्या वाचनांमधून वाचकाची मनो धारणा (Psychomotor Process) आकारत असते. त्यामुळे वाचन बहुआयामी, बहुविध प्रकारचे असण्यातून माणूस बहुश्रुत होत असतो. प्राथमिक वाचन अनुकरण असतं, तर प्रगल्भ वाचन स्वतंत्र. निरंतर चिकित्सक वाचन अनेकदा सृजनक्षमतांच्या दृष्टींनी मारक ठरते. केवळ बौद्धिक, तार्किक विचार माणसाला एकांगी बनवतो. भावनिक, काल्पनिक, रंजक वाचन माणसास सर्वांगी बनवते. माणूस अष्टपैलू होतो ते बहुश्रुत वाचनातून.
 वाचनाने व्यक्तीस केवळ शब्दार्थ कळून येणे पुरेसे नसते. दोन शब्दांमधील आशय हा शब्दार्थापेक्षा अधिक महत्त्वाचा असतो. त्यामुळेच सृजनात्मक वाचन अधिक महत्त्वाचे ठरते. शिक्षणात सृजन, कृती, शोध महत्त्वाचा असतो. बोध ही प्राथमिक क्रिया होय, तर शोध हे अंतिम लक्ष्य असते. त्याप्रत पोहोचायचे तर वाचन सृजनात्मक असणे अनिवार्य असते.
५.८.१ सृजनात्मक वाचनाचे घटक
  सृजनात्मक वाचन हा वाचनाचा एक प्रकार जसा आहे, तसा तो वाचन विषयक दृष्टिकोन (Approach) ही आहे. वाचन प्रक्रियेत वाचकाची तल्लीनता ही सृजनात्मक वाचनाची खरे तर पूर्वअट (Pre-Condition) होय. ही प्रक्रिया नीट घडायची तर त्यासाठी कृती, कल्पना, जिज्ञासा, तुलना, चिकित्सा ही कौशल्ये वाचकात असणे आवश्यकच नाही तर अनिवार्यही असते.

 जगात सर्वप्रथम सृजनात्मक वाचनाचा विचार इमर्सनने सन १८३७ मध्ये केला. त्याने ‘संहितेची पुनर्रचना' (Reordering the Text) आणि ‘संहिता सुधार' (Reforming the Text) या संदर्भात प्रथमत: विचार मांडले.आपण जे वाचतो त्याच्यातील नव्या आशयाचा शोध घेण्याची वृत्ती म्हणजे सृजनात्मक वाचन होय. संहिता जो आशय व्यक्त करते त्यापेक्षा नव्या आशयाच्या मांडणीच्या ध्यासातून सृजनात्मक वाचन जन्माला येत असते. एकाच संहितेतून अनेक वाचकांना अनेक प्रकारचा बोध होतो. कारण प्रत्येकाच्या वाचन व्यवहाराचे स्वरूप आणि प्रक्रिया भिन्न असते. चरित्र एकच पण त्याची मीमांसा भिन्न असते. कवितेची ओळ एकच पण प्रत्येक शिक्षक त्याचा अर्थ आपापल्या परीने भिन्न रूपात कथन करतो.

वाचन/८६