पान:वाचन (Vachan).pdf/86

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


माणूस वाचतो मुळी अनेक उद्देशांनी. ज्ञान प्राप्ती, जिज्ञासा, मनोरंजन, शोध अशा अनेक हेतुंनी वाचन घडत रहातं. त्याला एका विशिष्ट पठडीत बसवणं कठीण. कल्पना, निर्णय, आकलन, विचार अशा अनेक कृती, क्रियांच्या समन्वित परिणामातून वाचन उदयास येतं. त्यातला संवेदना पक्ष अधिक महत्त्वाचा. त्यामुळे वाचक पुस्तकात गुंग होऊन रहातो. वाचन अनेक प्रकारचं असतं -
१) मुक्त वा स्वच्छंदी वाचन (Open Reading)
२) मीमांसांत्मक वा चिकित्सक वाचन (Critical Reading)
३) सृजनात्मक वाचन (Creative Reading)
मुक्त वाचन
 बालवयातील बालबोध वाचन या प्रकारात मोडतं. प्राथमिक वाचन असंही या वाचनास म्हणता येईल. आगामी प्रगल्भ वाचनाची पायाभरणी या वाचनातून होते.
चिकित्सक वाचन
 वाच्य सामग्रीची चिकित्सा, समीक्षा, मीमांसा करणारं वाचन ते चिकित्सक, उच्च शिक्षणातून असं वाचन आकाराला येत असतं. चांगलंवाईट, विधी-निषेध, सकारात्मक-नकारात्मक गुण विशेषांची जाणीव चिकित्सक वाचनातून येत असते. प्रश्नोत्तर पद्धतीतून हे वाचन उदयाला येतं. यातून आकलन क्षमता विकसित होते. शिवाय स्वमताचा विकास घडून येऊन स्वतंत्र मताची घडण अशा वाचनातून होत असते. मूल्यमापन, विश्लेषण, रसग्रहण, कल्पनाविस्तार, सार-संक्षेप अशी कितीतरी ज्ञानात्मक कौशल्ये चिकित्सक वाचनातूनच आकारास येत असतात.
सृजनात्मक वाचन
सृजनात्मक वाचन दोन प्रकारचं असतं-
१) रुपांतरित वाचन (Convergent Reading)
२) परिवर्तित वाचन (Divergent Reading)

 पैकी रूपांतरित वाचनातून साहित्य आकाराला येत असते, तर परिवर्तित वाचनातून कल्पना आणि दृष्टिकोण विकसित होत असतात. वाचक अशा वाचन वैविध्यातून लेखकाच्या कल्पना आणि भावतरंगांपर्यंत पोहोचत असतो. सृजनात्मक वाचन वाचलेल्या पलिकडचे जग निर्माण करते.

वाचन/८५