पान:वाचन (Vachan).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विद्वान, विचारवंत, संपादक, साहित्यिक, संशोधक, अभ्यासक करत असलेले हे वाचन एकाच वेळी अनेक संदर्भ पुरावे, गोळा करत घडत असते. एखादा प्रश्न, समस्या, गोष्टीचे सर्व पक्ष समजून घेऊन नवमताच्या मांडणीसाठी केलेले हे वाचन संदर्भयुक्त, सोदाहरण घडत निर्मितीक्षम होते. ज्ञानासक्तीतून घडणारे हे वाचन सृजनक्षम असते. नव्याचा शोध ही त्याची कसोटी असते. माहिती पलीकडील अज्ञाताचा शोध ही या वाचनाची ऊर्जा असते. अग्रलेख, वैचारिक लेख, शोधनिबंध, समीक्षा इत्यादी या वाचनाची इतिश्री अथवा फलनिष्पत्ती असते. यास तुलना, विश्लेषण, खंडनमंडन अशा प्रक्रियांतून जात स्वत:ची घडण करावी लागत असते. विश्लेषण, मीमांसा, समीक्षा, सिद्धांत ही अशा वाचनावर उभी ज्ञानसंपदा असते. 'Red between the line' ही या वाचनाची शैली. ती संकेत, चिन्ह इ.पलीकडचे वाचन स्वशोध, बोध असतो. Type and Posted' अशा सोशल नेटवर्किंगच्या काळात असं वाचन म्हणजे उंबराचं फूलच म्हणायला हवं. वाचन ही जर तपश्चर्या असेल, तर त्याचा पुरावा म्हणजे प्रगल्भ वाचन. विचार व अभिव्यक्तीच्या द्वंद्वाने नटलेले हे वाचन. त्याचे स्वरूप कलात्मक खरेच. वाचन, चघळणे, खाणे असते की पचविणे, याचे उत्तर म्हणजे हे वाचन. 'Reading maketh the full men' असं बेकॉननी म्हटलं होतं, त्याला या वाचनाचा संदर्भ होता. बेकॉननीच 'of studies' मध्ये लिहून ठेवलंय की, 'Some books are to be tasted, others to be swallowed' म्हणून मग 'Reader's Digest जन्मलं.
५.८ सृजनात्मक वाचन

 अन्य प्राणीमात्रापासून माणसास वेगळा ठरविणारे जे अनेक घटक आहेत, त्यापैकी वाचन हा एक होय. हास्य, विचार, तर्काप्रमाणे वाचन कौशल्य केवळ मनुष्य मात्रातच आढळते. ज्ञान संपादन प्रक्रियेची माणसाइतकी संवेदी प्रक्रिया अन्य जीवजंतूत अभावानेच दिसून येते. आकलन क्षमता विकासाचे वाचनासारखे दुसरे साधन नाही. माहिती संपादन व संग्रहण वाचनामुळे सुलभ होत असते. वाचन म्हणजे केवळ लिखिताचा बोध नव्हे. तर अर्थ, आशय, तर्क इत्यादीद्वारे न लिहिलेला आशय वाचकास उमजतो, तो केवळ वाचकाच्या शहाणपणामुळे. बुद्धी, दृष्टी, मन, आकलन इत्यादीच्या गुंतागुंत प्रक्रियेतून वाचन विकास कौशल्य घडत रहाते. त्यातून मग सृजन क्षमतेचा विकास होतो. लिहित्या लेखकाचं वाचन त्यास लिहितं ठेवतं. अन्य बौद्धिक कौशल्याप्रमाणे वाचन हे पण एक सृजनात्मक कौशल्य होय. वाचन ही शरीरी क्रिया, तशीच ती मानसिक, भावनिक, बौद्धिक समन्वयक प्रक्रिया होय.

वाचन/८४