पान:वाचन (Vachan).pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५.७.२ कटाक्ष वाचन (Scanning)
 हॉटेल्सचे मेनुकार्ड, टेलिफोन डिरेक्टरी, वृत्तपत्रांचे मथळे, जाहिराती इत्यादींचे वाचन म्हणजे कटाक्ष वाचन. त्याची उपयोगिता क्षणिक नि प्रभावीही. वरवर नजर फिरवत केलेले हे वाचन. आपण वाच्य सामुग्री पाहतो, वाचतोच असे नाही, अशा प्रकारचं वाचन या सदरात मोडते.
५.७.३ गतिमान वाचन (Skimming)
 वरील प्रकारच्या वाचनाची ही पुढची पायरी. इथे पाहणे, थबकणे विचार करणे, निर्णय करणे महत्त्वाचे. तोपर्यंतचे हे वाचन, गरजेनुरूप होणारं हे वाचन, दृष्टिक्षेप टाकणे व ठरविणे इतक्या अल्पकालापुरतं होणारं हे वाचन याची क्षमता दर मिनिट १००० शब्दांपर्यंत जाऊ शकते. त्वरित निर्णयार्थ होणारं हे वाचन होय.
५.७.४ सोद्देश वाचन (Purposeful Reading)
 हेतुतः घडणारं हे वाचन प्रतिबद्ध, बांधील असल्याने ते गंभीर व एकग्रपणे केले जाते. हे वाचन शब्दशः, विचारपूर्वक होत असते. अभ्यासार्थ केलेले वाचन या कोटीतले असते. हे लक्षपूर्वक वाचन होय. शब्दार्थ, संकल्पना, सूत्रे समजून घेत केलेले हे वाचन परिणाम या कसोटीवर (निकाल, गुण, क्रमांक, श्रेणी, निवड इ.) घडत असल्याने यात कमालीची एकाग्रता असते; पण आकलनापेक्षा स्मरणावर इथे भर असतो, हे लक्षात ठेवायला हवे.
५.७.५ व्यापक वाचन (Extensive Reading)
 आनंददायी वाचनाची ही परी. तणावमुक्त वातावरणात केलेला मुक्तसंचार असे या वाचनाचं स्वरूप असते. याला स्थळ, काळ, विषय इत्यादींचं कसलंच बंधन असत नाही. छंद म्हणून केलेले वाचन. इथे परिणाम, प्रभावाची तमा नसते. निखळ आनंद हाच या वाचनाचा हेतू असतो. ज्येष्ठ नि युवकांचं बरंचसं वाचन या पठडीतले असते. बालपणीचं अबोध वाचन नि हे वाचन यात फरक असतो.
५.७.६ सखोल वा प्रगल्भ वाचन (Intensive Reading)

  ही वाचनाची सर्वांत प्रगत अवस्था म्हणायची. एकतर ते हेतुतः होत असतं शिवाय सखोलही. याची गती मंद असली तरी आकलन ही या वाचनाची खरी कसोटी असते.

वाचन/८३