पान:वाचन (Vachan).pdf/83

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


३. अनुमान
 वाचनानंतरचा निष्कर्ष महत्त्वाचा. वाचनाचा हेतू लक्षात घेऊन आकलनानंतर मूल्यमापन व मूल्यांकन करायला हवे, तरच आपण लक्ष्य गाठले असे होते. उद्देशपूर्ती म्हणजे वाचनाचे यश.
४. तुलना/भेद
 एकाच प्रकारचं अनेकांगी वाचन व विरोधी वाचन यातून समान दुवे जसे शोधायला हवेत तसे भेदही. त्यामुळे वाचन सामुग्रीची तुलना, चिकित्सा, मीमांसा शक्य होते. ते होणे अनिवार्य.
५. शंकानिरसन
 वाचनातून शंका दूर व्हाव्यात तसेच प्रश्न सुटणेही महत्त्वाचे. वाचन संकटमोचक हवे, तर वाचनाचा नवा पट्टा, टप्पा दृष्टिक्षेपात येऊन वाचन क्षितिज विस्तारते.
६. अन्वय
 वाचलेल्या गोष्टीचा आशय जीवनाशी, प्रश्नांशी, शंकांशी ओळख येऊन शंका-कुशंकांचे ढगाळ आभाळ निरभ्र होणे म्हणजे वाचन क्रांती. धुके जाऊन सूर्यप्रकाश लख्ख होणे म्हणजे ज्ञानाचा साक्षात्कार.
७. मत व वास्तव
 पूर्वमत घासून पुसून नवं होणं, गैरसमज दूर होणं, मतमतांतरांतून मन्वंतर घडून येणं म्हणजे अमृतमंथन.
८. इप्सित साध्यता
 वाचनपूर्व उद्देश व वाचनोत्तर मन्वंतर, मतसंग्रह म्हणजे वाचल्याचे आकलन होणे होय.
५.७ वाचन प्रकार
 वाचनाचा उद्देश व स्वरूप या आधारे वाचनाचे पाच प्रकार पडतात -
५.७.१ सहज वाचन (Light Reading)

 शिळोप्याचा उद्योग, वेळ घालवायचे साधन, मनोरंजन इत्यादी उद्देशांनी होणारे वाचन म्हणजे सहज वाचन होय. ते हेतुतः होत नसते. वरवरची माहिती, सूचना मिळविण्यासाठी केलेले हे वाचन. ते अल्पजीवी असते. वाचताच माणूस ते विसरूनही जात असतो. असे वाचन मिनिटास १००, २०० शब्दगतीने होत असते.

वाचन/८२