पान:वाचन (Vachan).pdf/73

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


निसर्गाचं हे रूप तसं वाचन कृतीचंपण समग्र रूप असतं. ते तुमच्या वाचन कलेच्या सर्वसमावेशक, एकात्म रूपामुळे (Hemeneutical Circle) निर्माण होतं. वाचन कला साधली की, वाचावं लागत नाही अशी संपृक्त अवस्था येते. ते वाचनाचं, वाचन कलेचे अलौकिक रूप असतं.
५.३.५ वाचन : एक विज्ञान  वाचनाच्या वैज्ञानिक अंगाचा विचार करताना लक्षात येते की, वाचन प्रक्रियेचा संबंध भाषाशास्त्र, तर्कशास्त्र, मानसशास्त्र इत्यादींशी असतो. त्यात उच्चारण पक्ष भाषाशास्त्राशी, विचारपक्ष मानसशास्त्राशी, तर अव्यक्त आशयाचा (सूचकार्थ) संबंध तर्कशास्त्राशी असतो. या अर्थाने वाचनशास्त्र एक मिश्रशास्त्र (complex Science) होय. वाचनाचा ९८% भाग उच्चार निगडित (श्राव्य), तर २% भाग दृश्य (दृक्) असतो. तो साधनपरत्वे बदलतो. पुस्तक, किंडल, मोबाईल, संगणक, टी.व्ही., सिनेमा प्रकारानुरूप वाचनाचे दृक्-श्राव्य प्रमाण बदलते. इतकेच नव्हे तर त्याचे प्रमाण, भार (वेटेज) हे कमी-अधिक असतो. वाचनशास्त्र हे प्रकारनिहाय वाचन प्रक्रिया, वाचन गती, वाचन पट, वाचन दोष, उच्चारण, श्रवण, आकलन प्रक्रिया यांचा विचार करणारे विज्ञान होय. ते वाचनाच्या विविध पक्षांचा अभ्यास करते. त्यानुसार वाचन, वाचक, प्रक्रियासंबंधी एक पिरॅमिड या शास्त्राने सूचित केले आहे. सर्वसाधारण वाचक शब्दार्थ व श्रवणकेंद्री असतो. यांचे प्रमाण समाजात सर्वाधिक असते, तर आकलनक्षम प्रगल्भ वाचक विरळा. खालील पिरॅमिडने हे शास्त्र सदर प्रमाण सूचित करते.

वाचन (Vachan).pdf

  वाचा, श्रवण, उच्चार, ध्वनी इत्यादींचे बारकावे, सूक्ष्मता, दोष, उपचार इत्यादींसंबंधी वाचनशास्त्र विचार करते. वाचन ही वर्तमानातली उपचार पद्धती बनली असून, मतिमंद, उदास, धक्का बसलेल्या व्यक्ती, विस्मरण, श्रवण, उच्चार दोष व्यक्तींसाठी वाचन उपचार विधी (Theory) म्हणून वापरली जाते.

वाचन/७२