पान:वाचन (Vachan).pdf/72

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


वाचन होते. आज वाचनाला एक वेगळे रूप आले आहे. 'Making Sense' असे त्याचे नवे रूप वाचनातील आकलनाचे महत्त्व अधोरेखित करते. त्यातून मानवी सर्जनास उपयोजित कौशल्यास जोडण्याची जी अपेक्षा व्यक्त होते, त्यातून या कलेचं उपयोजित सर्जक कला (Applied Creative Art) म्हणून उगम पावणारं रूप प्रौढ, प्रगल्भ होय. वाचन आता नुसतं उच्चारण कौशल्य राहिलेलं नाही. कल्पना, तर्क, बुद्धीची तिला मिळालेली जोड ही कला उन्नत असल्याचे स्पष्ट करते. वाचक लिखिताच्या ध्वनी, लक्षणा, अभिधादी शक्तींना पार करत व्यंग्यार्थ शोधतो. यात या कलेचे प्रौढत्व सामावलेले आहे. ही एक चिकित्सक प्रक्रिया आहे. ती गुंतागुंतीची आहे. तिला नियम, सूत्र नाही. नवोन्मेषधारी तिचं व्यवच्छेदक रूप वाचनास कला सिद्ध करते. कला शिकविता येत नाही. तिचा माग सांगता येतो. मार्ग मात्र ज्याचा त्याने शोधायचा. म्हणून ही कला एकाच लिखिताचे अनेक अर्थ शोधते. कॅलिडिओस्कोपसारखं वाचन म्हणजे अपरासृष्टीची निर्मिती! 'Making sense approach to reading हे कलारूपामुळेच शक्य होते.

  वाचन कला लेखक नि वाचकात एक गारुड निर्माण करत असते. हे। गारुड वाचकास लेखकाशी एकात्म बनविते. ते इतक्या टोकाचं होतं कधी कधी की वाचक लेखकच बनून जातो. वास्तव लेखक व वाचक यामधून साकारणारा नवा एकात्म लेखक (Implied writer) ही वाचन कलेची चरमसीमा (Climax) असते. वाचन कला वाचकास अभिजात बनविते. त्याच्या अभिरुचीचा पर्याप्त विकास करते. म्हणून टेरिनिअर मॉरसनी म्हणून ठेवलं आहे. (इ.स. १२८६) की, The fate of book depends on the discernment of Reader. वाचन कला लेखनाचा व्यत्यास वा प्रतिबिंबच म्हणायला हवे. बोलण्या-ऐकण्याचं जे अद्वैत तेच लेखन वाचनाचं. लेखन जन्मते ते वाचनार्थच. म्हणून वाचन कलेस आकलन कौशल्य (construal skill or art) मानलं जातं. या कला-कौशल्याच्या आधारेच पट्टीचा वाचक लेखनातील गूढ, गर्भित अर्थाचा धांडोळा घेत वाचत राहतो. चांगलेपणानं, एकाग्रतेने वाचणारा वाचक आपली तहान, भूक हरवतोच; शिवाय स्वत:सही तो विसर्जित करून मोकळा होतो. तो लेखकाचा मुखवटा (Mask) घेऊन जगतो. सामान्य वाचक शब्दार्थगामी तर कलात्मक वाचक गूढार्थगामी असतो. कलेमुळे ही विशेषता वाचक धारण करतो. यामुळे निसर्गवेड्यास जंगलात शिरल्यावर झाडे नाहीत दिसत, दिसतं फक्त जंगल.

वाचन/७१