पान:वाचन (Vachan).pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पहिल्यांदा कसा व्यक्त, अभिव्यक्त झाला? व्यक्त होण्याची त्याची प्रारंभिक पद्धत/रीत काय होती, हे जाणून घेणे मोठी रंजक गोष्ट आहे. माणूस एकदम लिहू नाही लागला. बोलायला पण फार उशिरा लागला. तो प्राण्यांप्रमाणे ओरडायचा; पण प्रसंगनिहाय त्याचं ओरडणं वेगळं असायचं. एकच उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. कुत्रा भुंकतो, केकाटतो नि रडतोही (विशेषतः रात्री). त्याच्या आवाजावरून आपण काय झालं असेल ते ओळखतो, मग आपणास अंदाज येतो. वनमानव असताना माणसाचं ओरडणं आनंद, शोक, भय, आश्चर्य इत्यादी क्षणी वेगवेगळं असायचं. या अनुभवातून तो भावसदृश हावभाव करू लागला. त्याची देहबोली बरीच बोलकी होती. मग तो रेषा, रेघोट्यांच्याद्वारे ‘मला काही सांगायचंय' असं न म्हणता बरंच काही सांगून जायचा. त्याच्या रेखाचित्रांतून तो जे सांगू पाहायचा, ते हळूहळू इतरांना उमजू लागलं नि रंग, रेषा, चित्रांद्वारे संवाद, संपर्काची परंपरा सुरू झाली. चित्रांची अक्षरं बनली. लिपी साकारली. हे सर्व तुम्ही वाचत रहाल, तर अशा नव्या विश्वात जाल, जेणेकरून तुमचा तुम्हालाच विकासबोध होत राहील. हे सर्व स्थळ, काळ, इतिहास, विकासाच्या टप्प्यांनी सांगितलं गेलं असल्याने ते वस्तुनिष्ठ नि वैज्ञानिक लेखन होय.
 आपण 'वाङ्मय’ आणि ‘साहित्य' असे दोन शब्द लेखनास वापरतो. ते आज एकमेकांचे पर्यायवाची वा पूरक असले तरी ते आलेत मात्र इतिहासातून. असेच दोन शब्द आहेत ‘लोकवाङ्मय' आणि 'लोकसाहित्य'. भाषेपूर्वी जशी बोली होती तसे लिखित साहित्यापूर्वी ऐकीव/मौखिक साहित्य होते ते ‘लोकवाङ्मय' होय. कारण ते केवळ बोली रूपात होते. श्रुतिस्मृति रूपात ते एका पिढीकडून दुस-या पिढीकडे जात जपले, जोपासले जायचे. 'Folklore' म्हणजे ‘लोकवाङ्मय' आणि 'Folk Literature म्हणजे लोकसाहित्य, लोकसाहित्य हे लोकवाङ्मयाचा लिखित अवतार वा संग्रह होय. तो नंतरच्या काळात सायास केला जातो. निरक्षर युगातले साहित्य म्हणजे लोकवाङ्मय. ते वाचिक, ऐकीव, स्मृतिआधारीत असायचे. ते अस्सल असते तसे सहज, स्वाभाविक सौंदर्याने युक्त. ना अलंकरणाची गरज, ना रचनेची. सहजस्फूर्त म्हणून सुंदर! लोककथा, लोकगीते, लोकनाट्य, लोकभ्रम, लोकरूढी, लोकनीती, लोककला, लोकक्रीडा, लोकसंगीत किती रूपात ते प्रकट होते त्याला काही सीमाच नाही.
 लोकवाङ्मयाचं विकसित रूप म्हणजे साहित्य. ते ग्रंथरूप होण्याचा इतिहास म्हणजे लेखन विकास होय.