पान:वाचन (Vachan).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुक्त, ललित, मनोहारी बनते. हस्तलिखित, मुद्रित, अंकीय, आभासी वाचन म्हणजे नवकाळाच्या नव्या परीचं आलोडन, परिवर्तन, कायाकल्प. ते कधी एकांगी, कधी गुंतागुंतीचं, तर कधी सामूहिकही असतं. उदाहरणार्थ प्रतिज्ञा वाचन, समूहगीत, सांघिक घोषणा, उद्घोषणा इत्यादी वाचन हे दृक्, श्राव्य नि दृक्-श्राव्य बनत ते आधुनिक संपर्क माध्यम बनून गेलं आहे. वाचनाला दिशा असते तशी तिची दशा, स्थितीही भिन्न असते. उजवीकडून डावीकडे की डावीकडून उजवीकडे वाचायचं ते भाषिक, वाचिक परंपरेने निश्चित होते. उर्दू नि मराठीतील फरक यासंदर्भात लक्षात घेता येतो. वरून खाली की खालून वर हे वाचन प्रयोगकाच्या (वाचक) गरजेवर ठरत असते. जाणीव, नेणीव, आकलन, क्रिया-प्रतिक्रियांनी ते युक्त असते आणि त्याआधारे वाचनाचे स्वरूप निश्चित होते. सुजाण वाचकासंदर्भात वाचकाचे पूर्वज्ञान गृहित असते. त्या गृहितावर वाचनाचं प्रगल्भपण, अभिजातपण निश्चित होतं. दुर्मीळ वा अपवाद ज्ञान-विज्ञान शाखा, अलक्षित संशोधन, मृतप्राय भाषा, तत्त्वज्ञान, प्राच्यविद्या इत्यादींचे चिंतन, मनन, वाचन व्यासंगी ठरते ते त्यामागील तपश्चर्या, कष्ट, सातत्य इत्यादींमुळेच.
५.३.१ वाचन प्रभाव   वाचन हे एकप्रकारचं आस्वादन असतं. आपण निसर्ग पाहतो नि हरखतो. चांदणं पाहतो नि आनंदून जातो. ते आपण नुसतं पाहतो असं नाही. चाखतो, अनुभवतो. चव प्रभावित करते तसे वाचनही. एखादा विचार, सुभाषित, तर्क, म्हण संदर्भाने पूर्वीपेक्षा अधिक भावते. तिचं कारण वाचताना आपण त्याचा संदर्भ पूर्वज्ञान, पूर्वानुभवाशी ताडतो म्हणून. उत्तुंग कल्पना वाचनातून जन्मतात. तो वाचन प्रभाव असतो. वाचनाने माणूस आतून, बाहेरून बदलून जातो. कायाकल्प, परिवर्तन, बदल, परकाया प्रवेश सारं वाचनामुळे घडत राहतं. वाचनापूर्वी आपण जे असतो, ते वाचनानंतर दुसरे बनतो, नवे होऊन जातो; खरे ना? वाचनात एक सुप्तशक्ती वास करीत असते, असं वाचनानं जाणवतं. त्यामुळे वाचनानंतर आपण पूर्वीपेक्षा अधिक शहाणे, समजदार, सुजाण बनतो.

 मार्क ट्वेन एकदा म्हणाला होता की, 'मी अंघोळीनंतर विरघळत नाही.' याचा अर्थ अंघोळीचा प्रभाव वरवरचा, क्षणिक. वाचनाचे मात्र वेगळे. वाचनामुळे माणूस विरघळतो तसाच गोठतोही. वाचनाला इंग्रजीत Decoding असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर वाचन हे अंक, अक्षरादी चिन्हांचा अर्थ लावतं, संदर्भ प्राप्त होतात म्हणून

वाचन/६७