पान:वाचन (Vachan).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाचन प्रकार व स्वरूप हे काळाच्या ओघात बदलत जाते. काळ, काम, वेगाचे गणित वर्तमानातील उसंत ठरवत असते, हे विसरून कसे चालेल?' 'Seeing Believing' या वाक्यातील गर्भितार्थ वर्तमानाचे वास्तव होय. म्हणून वाचनाचा विचार भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर, वर्तमानाचे भान ठेवून भविष्यवेध घेतच करायला हवा, तरच वाचन संस्कृती टिकेल व भविष्यात ती वर्धिष्णू होत राहील.
५.२ वाचन : शब्द, अर्थ, व्युत्पत्ती आणि व्याख्या
 रूढ अर्थाने ज्यास आपण वाचन म्हणतो, त्याचे स्वरूप भिन्न असल्याने वाचनास अनेक शब्दकळेनी ओळखले जाते. पठन, पाठन, अभ्यास, उच्चारण, परिभाषण, आकलन, अन्वय, संदर्भ, चाळणे, पाहणे, भाषांतर, दृष्टिक्षेप इत्यादी शब्द वाचन-क्रिया सूचित करणाच्या आहेत. या प्रत्येक शब्दामुळे वाचनाचे बदलते रूप-स्वरूप लक्षात यायला मदत होते.
 वाचणे वा वाचन म्हणजे लिहिलेली अक्षरे उच्चारणे. हे उच्चारण प्रगट असते तसे मौनही. वाचन शब्द ‘वच्' धातूपासून बनला आहे. ‘वच्’ धातूचा अर्थ सांगणे, बोलणे, भाषण, वर्णन, पुकारणे (उच्चारण), म्हणणे. पाठांतर, वाचन, घोषणा, व्याख्या असा विविध रूपी असून तो वाचन स्वरूपाशीच निगडित आहे. 'वाच्' धातू ‘वाक्'सदृश होय. वाचन, वाचा, वाच्य, वाच्यता, वाच्यांश, वाच्यार्थ शब्दांनी वाचन व्यापकता लक्षात येते. वाङ्मय हा शब्द त्याचे मौखिक वा वाक्मय रूप सूचित करतो. 'वञ्च'पासून वाचणे, बाँचना (हिंदी), वंच (प्राकृत), बाचा (बंगाली), बंचिबो (ओडिया), बॉन्चु (नेपाळी), वाजणु (सिंधी), वच्यते (संस्कृत), वज्जति (पाली) शब्द वाचनसूचकच होत.
 विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आपल्या ‘निबंधमाला' पुस्तकातील ‘वाचन शीर्षक निबंधात वाचनाचा अर्थ 'बोलावणे' असा सांगितला आहे. पुस्तकास बोलवणे म्हणजे पुस्तक वाचते करणे, वाचणे होय. निर्जीव लिखित सामग्रीस वा मजकुरास उच्चाराद्वारे सजीव, प्रगट करणे म्हणजे वाचणे होय. कागदी निर्जीव मजकूर वाचनाने जिवंत करण्याची कला म्हणून पूर्वी वाचनाकडे पाहिले जात असते. वाचलेले घोकणे, स्मरणात ठेवणे यालाच पूर्वी बुद्धिमत्ता मानले जात असे. पाठांतर हे बुद्धीवैभव मानल्या गेलेल्या काळात सर्व ज्ञान-विज्ञानाच्या रक्षणाचे एकमेव साधन स्मरणशक्ती होते, हे यासंदर्भात लक्षात घ्यायला हवे.


१. संस्कृत - हिंदी कोश- वामन शिवराम आपटे/मोतीलाल बनारसीदास पब्लिशर्स, प्रा.लि., दिल्ली/२००१/पृ. ८८९, ८९०

वाचन/६२