पान:वाचन (Vachan).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५. वाचन : स्वरूप आणि व्याप्ती
५.१ वाचन

  माणसाच्या वाचनाचे स्वरूप भिन्न आहे. छंद, मनोरंजन, अभ्यास, फावल्या वेळेचे साधन, व्यासंग, साधना अशी वाचनाची अनेक रूपे आहेत. सर्वसामान्य माणूस छंद, मनोरंजन, फावल्या वेळचे साधन म्हणून वाचतो. तो काय वाचतो हेही महत्त्वाचं असतं. म्हणजे तो वृत्तपत्र, नियतकालिक वाचतो की ग्रंथ यावरूनही वाचकाच्या वाचनाचे स्वरूप लक्षात येते. ग्रंथ वाचत असेल तर तो साहित्य वाचतो, विज्ञान की तत्त्वज्ञान यावरही त्याच्या वाचनाचा उद्देश लक्षात येतो. कथा, कादंबरी, काव्य वाचन सुलभ तर निबंध, नाटक सायास वाचन. प्रवासवर्णन, साहित्य, जीवनोपयोगी. आत्मकथा, चरित्र प्रेरक वाचन. विद्यार्थी अभ्यास म्हणून वाचतात ते ज्ञानसंपादन व ज्ञानवर्धक वाचन होय. शिळोप्याचा उद्योग म्हणून वाचन करणे व हेतुतः एकाग्र, आकलनक्षम, रसास्वादी वाचन करणे यात मूलत: उद्देश व गांभीर्याचा फरक आहे. परिपाठ म्हणून वाचन करणे कर्मकांड होय. हेतुत: उद्देशमूलक वाचन व्यासंगी व प्रगल्भ वाचन होय. ज्ञान-विज्ञानाच्या आजच्या रोज विस्तारित नि विकसित होत जाणा-या जगात वरील सर्वप्रकारचे वाचन त्या त्या वाचकवर्गाची दैनंदिन गरज होऊन बसली आहे. पूर्वी केव्हातरी लिखित सामग्री पाठ, प्रगट वाचन हा ज्ञानसाधनेचा अविभाज्य भाग होता. पुढे मौन, एकाग्र वाचन खरे वाचन बनले. आज पाहणेसुद्धा वाचनाचा प्रकार होऊन बसला आहे. वृत्तपत्र, जाहिरात, सिनेमा, दृक्-श्राव्य फित, चित्र, मोबाईलवरील संदेश, पोस्ट, ब्लॉग्ज इत्यादींवर नजर फिरविणे हे वर्तमान संक्षिप्त वाचनच होय.

वाचन/६१