पान:वाचन (Vachan).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सीझरने या ग्रंथालयाचा नाश केला. आता ते ग्रंथालय परत उभारण्यात/ पुनरुज्जीवित करण्यात आले आहे.
 रोमन साम्राज्यातही अनेक मोठी ग्रंथालये होती. ग्रीक संस्कृतीची ती वैभव होती. 'कोडेक्स व्हॅटिकेनस' हा रोमन लिपीतील दुर्मीळ ग्रंथ चौथ्या शतकात होता. सिसेरोचा स्वत:चा मोठा ग्रंथसंग्रह होता. ल्युकल्सचेही स्वत:चे ग्रंथालय होते. रोम शहरातच अठ्ठावीस ग्रंथालये होती. ती वस्तुसंग्रहालयेही होती.

 युरोपात सोळाव्या शतकातील प्रबोधन काळात (Renaissance) कागदाच्या शोधामुळे ग्रंथसंग्रहात गती आली. सतराव्या शतकात ग्रंथालयांचे नवयुग अवतरले. एकोणिसाव्या शतकात पाश्चिमात्य देशांत औद्योगिक क्रांती घडून आली. बव्हेरियन स्टेट लायब्ररी (जर्मनी)चे मार्टिन इलेटिंजर, ब्रिटिश म्युझियम, लंडनचे अँटोनी पानित्सी, त्यांचे समकालीन एडवर्ड एडवर्डस् इ. ग्रंथपालांनी ग्रंथालयशास्त्र विकसित केले. पुढे अमेरिकेत विद्यापीठीय ग्रंथालयांची शृंखला विकसित झाली. हॉर्वर्ड विद्यापीठ हेच मुळी एक ग्रंथालय होते. पुढे ते विद्यापीठ झाले. यातून ग्रंथालयांचे महत्त्व अधोरेखित होते. लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन स्थापनेने ग्रंथालये आंतरराष्ट्रीय केंद्रे बनली. सध्या अमेरिका, चीन, रशिया, इंग्लंड, फ्रान्स इ.प्रमाणे सर्व देशांनी आपापली राष्ट्रीय ग्रंथालये उभारली आहेत. भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय राजाराम मोहन राय ग्रंथालय, कोलकाता येथे असून, तिथे सर्व भारतीय भाषांतील ग्रंथ संग्रहित आहेत. भारतीय ग्रंथांचा विकास हेच ग्रंथालय करते.

वाचन/६०