पान:वाचन (Vachan).pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अलीकडे झालेले संशोधन, उत्खनन इत्यादींच्या आधारे जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय हे सुमेरियन व बॅबिलोनियन संस्कृतीच्या काळात म्हणजे इ.स. पूर्व २७०० वर्षांपूर्वी अस्तित्वात होते असे दिसते. हे ग्रंथालय धार्मिक अमलाखाली असलेले तत्कालीन शासकीय ग्रंथालय गणले जाते. पूर्वी टेयोमध्ये ३०,००० ग्रंथालये होती असे सांगितले जाते. या ग्रंथालयात अधिकांश ग्रंथ क्यूनिफॉर्म रूपात म्हणजे इष्टिका ग्रंथांच्या रूपात होते. पूर्वी देवालये, चर्च, मशिदी, राजवाडे हे ग्रंथसंग्रहांचे केंद्र होते. नंतर ती जागा दरबारांनी घेतली. त्याचीच पुढे शासकीय ग्रंथालये झाली.
 बॅबिलोनियन संस्कृतीस सुमेरियन संस्कृतीची परंपरा नि पाठबळ लाभले होते. त्यामुळे ती अधिक विकसित झाली होती. या संस्कृती काळात बॉर्सिपा इथे एक ग्रंथालय होते. ते तत्कालीन राजकीय, व्यापार, धर्म, संस्कृती घडामोडींची नोंद व जतन करणारे केंद्र होते. जगातील पहिली विधी संहिता (कायदा) हमुराबी राजाने इष्टिका ग्रंथाच्या रूपात कोरून घेतला होता. तो या ग्रंथालयात होता. सध्या तो पॅरिसच्या ग्रंथालयात संग्रहित आहे.
 इ.स. पूर्व ६६८-६२७ या काळात असुर बनिपाल नावाचा एक राजा होता. बॅबिलोनियन संस्कृतीचा हा काळ. अॅसिरियन घराण्याचे राज्य होते. या राजाने आपल्या राजकिर्दीत निनेव्ह येथील मंदिराजवळ मोठे ग्रंथालय स्थापले होते. तेथे त्यांनी बॉर्सिपा ग्रंथालयातील ग्रंथांच्या नकला करवून घेतल्या होत्या. इ.स. १८५० मध्ये ऑस्टिन लेअर्डने जे प्राचीन उत्खनन केले, त्यात या ग्रंथालयाचा शोध लागला. या ग्रंथालयातील काही ग्रंथ आर्ष (ऋषीरचित) होते.
 पपायरसवर लिहिलेल्या व गुंडाळ्यांच्या रूपात असलेल्या ग्रंथांचा संग्रह इ.स. पूर्व २५०० च्या काळात इजिप्तमध्ये होता. गीझा येथील ग्रंथालयात हे ग्रंथ होते. ते हायरोग्लेफिक लिपीत लिहिले गेले होते. ते दुस-या रॅमसीझने स्थापन केले होते. तिथे ‘प्रिसी पपायरस' हा दुर्मीळ ग्रंथ होता. आता तो पॅरिसच्या नॅशनल लायब्ररीत (बिब्लिओथेक नॅशनल) उपलब्ध आहे.

 इजिप्त संस्कृतीतील जगप्रसिद्ध अलेक्झांड्रिया ग्रंथालय इ.स. पूर्व २९० मध्ये ग्रीक राजा टॉलेमीने उभारले होते. तिथे ७ लाख ग्रंथ होते.

वाचन/५९