Jump to content

पान:वाचन (Vachan).pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तुम्हास प्रगल्भ वाचक व्हायचे असेल तर...
 सन १९०० मध्ये कोल्हापुरातून प्रकाशित होणाऱ्या 'ग्रंथमाला' मासिकात प्रकाशित झालेला सुमारे ८० पृष्ठांचा निबंध त्या मासिकाचे संपादक वि.गो. विजापूरकर यांनी नंतर पुस्तक रूपात प्रकाशित केला होता. त्याचे लेखक यादव शंकर बावीकर होते. त्याची किंमत १० आणे होती. पुस्तकाचे नाव 'वाचन' होते. सुमारे ११८ वर्षांनंतर 'वाचन' विषयावर लिहिलेल्या माझ्या पुस्तकाचे नाव 'वाचन'च आहे. हे अनुकरण नसून केवळ योगायोग अथवा इतिहासाची केवळ पुनरावृत्ती मानावी.
 वाचन हा पूर्वी माझा छंद होता, आता तो व्यासंग झाला आहे.'वाचन' विषयावर पुस्तक लिहिण्याचा विचार गेले अनेक दिवस माझ्या मनात होता; पण अशा प्रकारच्या पुस्तक लेखनास लागणारी उसंत न लाभल्याने हे लेखन लांबत गेले. या पुस्तकाच्या शेवटच्या परिशिष्टात मी 'वाचन विषयक ग्रंथ आणि विशेषांकाची सूची जोडली आहे. १९७५ पासून मी जाणतेपणाने वाचत आलो आहे. तेव्हापासून सतत 'वाचन' विषयक ग्रंथ वाचनात आणि संग्रहात भरच पडत गेली आहे. ही सर्व पुस्तके वाचनाच्या अनुषंगाने अधिक लिहिली जातात; पण वाचन व्यवहार, प्रक्रिया, स्वरूप, पद्धती अशा अंगाने आपण वाचनाचा विचारच करीत नाही. एका अर्थाने हे पुस्तक 'वाचन विषयक व्याख्या, स्वरूप, पद्धती अशा अंगाने वाचनाची सैद्धांतिक मांडणी करू पाहते आहे.
 पुस्तकाचा प्रारंभ होतो आविष्कार, अनुभूती आणि अभिव्यक्ती विषयक मांडणी करत. हे पुस्तक एका अर्थाने वाचनाच्या अंगाने घेतलेला मानवी विकासाचा शोधच होय. माणसाला व्यक्त केव्हा व्हावंसं वाटलं?