पान:वाचन (Vachan).pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माणूस सुसंस्कृत झाला यात ग्रंथालयांचे मोठे योगदान आहे. कारण त्यांनी केवळ ग्रंथसंग्रह केला नाही तर वाचकांच्या पिढ्या घडविल्या. ज्ञानसत्रे, व्याख्यानमाला, चर्चासत्रे, पुस्तक प्रकाशने करून त्यांनी वाचन संस्कृती निर्माण केली. ग्रंथालये समृद्ध असलेला देश ज्ञानसमृद्ध मानला जातो. ग्रंथ, वाचक व सेवक अशा तीन घटकांनी ग्रंथालय आकारते. ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह संख्या, दुर्मिळ ग्रंथ, संदर्भ पुरविण्याची व्यवस्था, वाचकसेवी प्रशासन, सुसज्ज इमारत हे ग्रंथालयाचे खरे वैभव होय.
  प्राचीन ग्रंथालयात प्रारंभीच्या काळात इष्टिका ग्रंथांचा भरणा असायचा. नंतर पपायरसच्या भेंडोळ्या ग्रंथ बनले. काही काळानंतर टिकाऊ ग्रंथांच्या गरजेतून चमड्यावर लिहिले जाऊ लागले. ते ठेवणे, बांधणे, वाचणे गैरसोयीचे वाटण्यातून कागदाचा जन्म झाला. त्यातून पुस्तके, मासिके, वृत्तपत्रे आकाराला आली नि ग्रंथालये दिवसेंदिवस ज्ञानकेंद्रे बनत गेली. कागदपत्रे, हस्तलिखिते, नकाशे, छायाचित्रे, शिल्पाकृती, शिलालेख, नाणी, तिकिटे, ध्वनिमुद्रिका, ग्रामोफोन, मुद्रितफिती (टेप्स), टेपरेकॉर्डर, फिल्म, प्रोजेक्टर, सूक्ष्मपत्रे (मायक्रोकार्ड, सिमकार्डस्), दृक्-श्राव्य फिती (व्हिडिओ टेप्स), व्हिडिओ रेकॉर्डर/कॅमेरा, डी.एल.पी., टेलिव्हिजन, स्कॅनर, संगणक, प्रिंटर्स इ. साधनांद्वारे ग्रंथालये समृद्ध असतात. दुर्मिळ माहितीचा खजिना, संदर्भसंग्रह असतो म्हणून ग्रंथालय एका अर्थाने पुराभिलेखागार (Archive) असते. ही साधने व संग्रह जतन करण्याचे मोठे कार्य ग्रंथालये करीत असतात.
  ग्रंथालये संस्कृती संरक्षण व संवर्धन करणारे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्र होय. ग्रंथालयाद्वारे खालील कार्य केले जाते -
(१) समाजातील सर्व थरांतील, वयोगटांतील वाचक वर्गास पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके इ.सदृश अत्याधुनिक ज्ञानसाधने (वरील इलेक्ट्रॉनिक संसाधने) पुरविणे.
(२) पुस्तक प्रकाशने, चर्चासत्रे, परिषदा इ. आयोजन करून आधुनिक ज्ञान साधनांच्या आधारे ज्ञानसंवर्धन व ज्ञान प्रसार करणे.
(३) स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींची माहिती पूर्वग्रह न बाळगता सर्वांना उपलब्ध करून देणे.
(४) समाजात व्यापार, उद्योग, व्यवसाय वृद्धीसाठी आधुनिक तंत्रज्ञानासंबंधी जागृती घडवून आणण्याकामी मार्गदर्शन सेवा उपलब्ध करून देणे.

(५) वाचक जागृती, लेखन प्रशिक्षण, वाचन-लेखन स्पर्धा इ. उपक्रम योजना वाचन संस्कृतीचा विकास करणे.

वाचन/५८