पान:वाचन (Vachan).pdf/58

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


(३) कथेतर ग्रंथांमधील उपशीर्षकरचना, प्रकरणे व उपसंहार
 मूळ ग्रंथ संहितेतील प्रकरणे, अध्याय रचना यांचे आकलन वाचकांस त्यांच्या शीर्षक, उपशीर्षकातून होत असल्याने त्यांचे वाचन व आकलन मूळ ग्रंथ वाचन सुस्पष्ट व समृद्ध करते. शीर्षकांमुळे त्याखालील मजकूर लक्षात येऊन त्याची वाचन शक्यता वाढते तशी रुंदावतेही. ग्रंथाचा आशय, विषय या वाचनातून सुस्पष्ट होतो. प्रकरणाच्या शेवटी असलेले निष्कर्ष, सार वा ग्रंथाच्या शेवटी असलेल्या समारोप/उपसंहार मजकुरातून वाचलेल्या मजकुराच्या आकलनास दुजोरा मिळत असल्याने त्यांचे वाचन मूळ ग्रंथ वाचनाइतकेच महत्त्वाचे असते. ते केलेले वाचन स्थिर, स्थायी व स्मरणीय बनविते. कथात्मक साहित्याचा शेवट कळाला नाही, तर सारे वाचन व्यर्थ ठरते. यावरून समारोप, निष्कर्ष, उपसंहाराचे महत्त्व अधोरेखित होते, हे वेगळे सांगायची गरज नाही. कथात्मक साहित्याचा अंत मात्र क्रमाने शेवटीच वाचायला हवा अन्यथा त्याची गंमत, जिज्ञासा शून्य होते. चित्रपटाचा शेवट माहीत असेल तर तो न पाहिलेलाच बरा.
(४) समीक्षा, परीक्षणे वाचन
 पुस्तकांची समीक्षा, परीक्षणे वाचणे यांतून पुस्तकांविषयी जिज्ञासा निर्माण होते, तसेच वाचनेतर अशा समीक्षा, परीक्षण वाचनातून आपल्याला झालेल्या आकलनाचा धांडोळा घेणे. ताडून पाहणे शक्य होते. म्हणून असे वाचन वृत्तपत्रे, नियतकालिके ई-पत्रिका, संकेतस्थळे, ब्लॉग इत्यादींतून करायला हवे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, गुगल, प्रकाशकांची संकेतस्थळे, मुखपत्रके (House Magazines), पुस्तक सूची (Catalogue) वाचन पूरक वाचन म्हणून उपकारक असते. असे मजकूर, लेख संक्षिप्त असल्याने ‘गागर मे सागर' गुणवैशिष्ट्याने युक्त असतात. अल्पाक्षरी व बहुगुणी मजकूर वाचनाने आपली वाचन समृद्धी वाढण्यास साहाय्य होते. कधी कधी असे मजकूर भलावण करणारे असले तरी कधी-कधी ते भ्रमित करणारे पण असतात. परंतु, चोखंदळ वाचकास जाहिरात व लेख यातील अंतर वाचतानाच उमगत जाते. इंटरनेटवरील बहुतारांकित श्रेणी (Star Ratings) प्रत्येक वेळी वस्तुनिष्ठ असेलच असे नाही. तरीही त्यामुळे वाचक कल, मतानुसारी वाचन प्राधान्य ठरविण्यास ते मार्गदर्शक असते.
४.७ ग्रंथालय : उगम आणि विकास

 ग्रंथालय म्हणजे ग्रंथसंग्रहालय. माणूस लिहू, वाचू लागल्यापासून ग्रंथालये अस्तित्वात आहेत. ती आपल्या संस्कृतीचे अभिन्न अंग आहे.

वाचन/५७