पान:वाचन (Vachan).pdf/57

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


दाणे टिपण्याच्या (GLen) तत्परतेने ही निवड होणे आवश्यक असते. पुस्तक शीर्षक, अनुक्रमणिका, प्रकरणातील उपशीर्षकांच्या दृष्टिक्षेपातून होणारं वाचन निवडीस पूरक ठरतं. ग्रंथ काय सांगू पाहतो त्याचा अचूक अंदाज घेता येणं महत्त्वाचं. ही क्रिया व्यक्तिसापेक्ष असते; पण ती प्रतिक्षिप्त होणं आवश्यक. ‘सत्याचा शोध', ‘धर्मचिंतन', 'चाणक्य मीमांसा' अशी स्पष्ट शीर्षके शोधास पूरक ठरतात. मुखपृष्ठे ही सूचक, पूरक असणारी असतील तर ती निवडीत महत्त्वाची भूमिका बजावतात. मलपृष्ठ मजकूर ब-याचदा वाचनास प्रेरणा देणारा, मार्गदर्शन करणारा व त्या अर्थाने निवड सार्थ ठरविणारा असतो. चोखंदळ वाचक मलपृष्ठ मजकूर, मुखपृष्ठाच्या दुमडलेल्या भागावरील (Flap) भाष्य, लेखक परिचय इत्यादी आधारे निवड करतो. त्यामुळे ही सहसा अचूक ठरते. अलीकडच्या काळात विपणन (Marketing) मुख्य झाल्याने असे मजकूर दिग्भ्रमित करण्याची शक्यता असते. तरी असे मजकूरही पुस्तकाचा सुगावा देऊन जातात.
(२) पुस्तकपूर्व मजकूर (मनोगत, प्रस्तावना इ.)

 पुस्तकाच्या मूळ संहितेपूर्वी तिचा परिचय, ओळख, क्रम समजावणारी लेखकीय भूमिका, प्रस्तावना, अनुक्रमणिका, विषय विस्तार सांगणाच्या पानांचे वाचन मूळ ग्रंथ वाचनाची भूमिका, मानसिकता तयार करणारी असते. विषय प्रवेश, ओळख म्हणून हा मजकूर वाचणे पुढील वाचन सुलभ करत राहते. पुस्तकाच्या शेवटी असणारा कोष्टके, परिशिष्टे, संदर्भ सूची, विषय, व्यक्ती नामावली इत्यादी मजकूरही असाच महत्त्वाचा असतो. वाचन काळात अथवा वाचनोत्तर सुस्पष्टतेसाठी त्यांचे वाचन तितकेच महत्त्वाचे असते. कथेतर साहित्य वाचनात (Non Fiction Reading) यांचे महत्त्व असाधारण ठरते. संपूर्ण पुस्तकाचे काहीएक आकलन व आवाका ग्रंथ पूर्व आणि ग्रंथोत्तर पृष्ठातून वाचकास येतो. कथात्मक साहित्यात कथाकार आपल्या कृतीची जी भूमिका विशद करतो, ती वाचकांची मानसिक धारणा तयार करते. वाचन प्रेरणा म्हणूनही असा मजकूर मूळ ग्रंथ वा कृती वाचनापूर्वी वाचणे फायदेशीर, उपकारक ठरते. लेखक, उद्देश, ग्रंथ रचना, विषय विवेचन इ. दृष्टिनेही या पानांमुळे वाचक आश्वस्त होत असतो. ग्रंथ वाचनाची पार्श्वभूमी तयार करणारी ही पाने अशा दृष्टींनीही महत्त्वाची असतात की त्यामुळे वाचक वाचनपूर्व गृहितके तयार करून ग्रंथाशी भिडला की मग पुस्तक वाचन अर्धवट राहात नाही.

वाचन/५६