पान:वाचन (Vachan).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विशेषतः ग्रंथालय, दुकान इत्यादींमध्ये वाचकाने जाऊन पुस्तकाची निवड करण्याच्या क्रियेचं हे वाचन. निवडपूर्व वाचन म्हणता येईल याला. हा एक प्रयत्न असतो. हाताळत केलेलं हे वाचन, लेखक, पुस्तकांचा काही एक अंदाज या वाचनातून वाचकाच्या हाती येतो. कटाक्षात केलेले हे वाचन. त्याआधारे झालेली निवड यातच वाचकाच्या प्रगल्भतेची खरी कसोटी असते. आशय, आकलन त्वरित करण्याच्या इराद्यातून हे वाचन घडतं.
 (३) विश्लेषणात्मक वाचन (Analytical Reading) पुस्तकात गढून (Live) केलेले वाचन म्हणजे विश्लेषणात्मक वाचन. यासाठी पूर्ण एकाग्रता नि मनस्विता अपेक्षित असते. हे वाचन असतं धीराचं नि मन:पूत केलेलं. या वाचनात वाचक लेखकाशी एकरूप होऊन जातो. असे वाचक मात्र अपवाद असतात. असं वाचन अनेकदा होतं नि प्रत्येक वेळी ते नवी अनुभूती, आनंद, ज्ञान देत राहतं.
 (४) सारभूत वाचन (Synoptical Reading) व्यासंगी, अभ्यासक, संशोधक, साहित्यिक, समीक्षक ज्या प्रकारचं वाचन करतात ते सारभूत असतं. यात एकाच विषयावरील अनेक पुस्तकांचे वाचन संदर्भानुसार होतं. यातील वाचन तुलनात्मक, समीक्षात्मक असतं तसं स्वतंत्रही. मूलभूत विचार, सिद्धांत, तत्त्व शोधासाठी केलेले हे वाचन सखोल असतं नि सारग्राही. महाविद्यालयीन शिक्षणानंतरचं हे वाचन पूर्ववाचनाचा पुनर्शोध असतो. नव्या मांडणीसाठी हे वाचन होत राहतं. आसक्ती, छंद, ओढीतून हे वाचन घडतं.
 ४.५.३ ग्रंथवाचन पद्धती (Method of Reading)
 (१) मुखपृष्ठ, शीर्षक नि मलपृष्ठ अवलोकन

वाचनार्थ पुस्तक निवडताना ती चोखंदळ होण्याने श्रम, वेळ, पैशाची बचत होते. वाचनार्थ पुस्तक निवडताना मुखपृष्ठ पाहणे, न्याहाळणे, समजून घेणे महत्त्वाचे असते. शीर्षकातून आशय प्रतिबिंबित होतो हे खरे आहे; पण कथात्मक साहित्य (Fiction) याला अपवाद ठरू शकते. अशा साहित्याची, पुस्तकांची शीर्षके मिथकीय, प्रतीकात्मक, व्यंगात्मक, सूचक, गूढ कधीकधी अनाकलनीयही असतात (उदा. श्याम मनोहरांची शीर्षके). मात्र, विविध ज्ञान, विज्ञान, समीक्षेची शीर्षके वस्तुनिष्ठ असल्याने निवडीस ती साहाय्यक ठरतात. प्रथमदर्शनी केली जाणारी ही पाहणी. वाचन मात्र लक्षपूर्वक गांभीर्याने झाले, तर सर्वप्रकारचा अपव्यय टाळता येणे शक्य असते.

वाचन/५५