पान:वाचन (Vachan).pdf/55

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आता वस्त्र आणि वस्तूवरील छपाई हा नवा स्वतंत्र यशस्वी उद्योग ठरला आहे. मुद्रण कलेवर आज मोठ्या प्रमाणात ग्रंथ, मासिके, संदर्भग्रंथ उपलब्ध असून, मुद्रणाचे छोटे-मोठे अभ्यासक्रम विद्यापीठे शिकवित आहेत. एकेकाळी कला असणारे मुद्रण आज स्वतंत्र विद्याशाखा, तंत्रज्ञान म्हणून विकसित पावले आहे. केवळ मौखिक आदेशाद्वारे मुद्रण करणे आता शक्य झाले आहे. मुद्रणातून सुरक्षा, सांकेतिकता जपण्याचे, गुणवत्ता नियंत्रणाचे, देवाणघेवाण (बार कोडिंग) तंत्र म्हणजे वेळ, श्रम बचतीचे मोठे साधन बनून राहिले आहे. मुद्रणाने मानवाचे अवघे जीवन व्यापून राहिले आहे.
४.६ ग्रंथ वाचन : पद्धती व प्रकार

४.६.१ ग्रंथ कसे वाचावेत?

 ग्रंथ कसे वाचावेत अथवा वाचले जातात, यासंदर्भात फ्रान्सिस बेकनचं एक प्रसिद्ध विधान आहे - 'Some books are to be tasted, other to be swallowed and few to be chewed and digested.' काही पुस्तकांची नुसती चव बघायची, काही गिळायची तर काही चाखत पचवायची.' ग्रंथ कसे वाचावेत याअनुषंगाने मॉर्टिमर अॅडलर यांनी १९४० मध्ये 'How to Read a Book' शीर्षकाचं पुस्तकच लिहिलं असून, त्यात त्यांनी वाचन प्रकार व पद्धतींची विस्ताराने चर्चा केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रंथ वाचन चार प्रकारचे असते.
४.६.२ ग्रंथ वाचन प्रकार
(१) प्राथमिक वाचन (Elementary Reading) बाल्यावस्थेतलं वाचन असतं तसं हे बालबोध वाचन, प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्याचं वाचन म्हणजे अंक, अक्षरांची ओळख व उच्चारण. शिवाय ते ब-याचदा प्रगट (मौखिक) असतं. शब्दज्ञानाच्या मर्यादेतलं हे वाचन अर्थबोध करणारं असतं. ते विषय समजावतं, आशय नाही. काही एक समज, ज्ञान, भान देणारे वाचन एक कर्मकांड असते.

(२) निरीक्षक वाचन (Inspectional Reading) वाचनासाठी पुस्तक निवडण्यापूर्वी वरवर चाळणं, पाहणं, शीर्षक, प्रारंभिक पानं (प्रस्तावना, मनोगत, मलपृष्ठ मजकूर (ब्लर्ब) वाचून पुस्तकाचा अंदाज घेत केलेलं वाचन म्हणजे निरीक्षक वाचन. आदमास घेत केलेलं वाचन हे पुस्तक चाखणं असतं. याला इंग्रजीत skimming म्हणतात. म्हणजे एका दृष्टिक्षेपात झालेलं वाचन. डोळे फिरविणे इतकंच त्या वाचनाचं स्वरूप असतं.

वाचन/५४