पान:वाचन (Vachan).pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्या वेळी ही हस्तकला वा क्रिया होती. त्या वेळी मुद्रणासाठी कागद, ठसे (प्रतिमा) व शाई / रंग या तीन गोष्टींची गरज असायची. कागदाचा शोध मुद्रणाआधीचा आहे. मुद्रण कलापूर्व एक दशक कागद निर्मिती सुरू झाली. शाई तयार करण्याची कला / क्रिया मात्र फार प्राचीन म्हणावी लागेल. कारण, कागदाआधी सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीच शाईचा शोध लागला होता. याच काळात थोड्या वर्षांनी कोरीव अक्षर ठसे, मुद्रा वापरण्याची पद्धत सुरू झाली. सुरुवातीस अक्षरे लाकडी असत. नंतर ती टिकावू व्हावी म्हणून धातूंची (पंधरावे शतक) करण्यात आली. गोंद इ.ने अक्षरे चिकटवून प्रती काढल्या जात. कागदाचा । प्रसार युरोपमध्ये झाला तसा मुद्रणास गती आली. मुद्रा, मातृका इ. शिशाच्या करून त्या सुट्या किंवा एकत्र करून छापण्याच्या प्रयत्नांतून मुद्रण कला निरंतर विकसित होत गेली. मुद्रण यंत्रपूर्व काळ हा मुद्रणकलेचा मानण्यात येतो. यंत्र शोधाने कलेचे रूपांतर उद्योगधंद्यात झाले.
४.५.२ मुद्रण यंत्र : शोध आणि विकास पंधराव्या शतकात योहान गटेनबर्क याने मुद्रण यंत्राचा शोध लावला. त्याने छापलेल्या ४२ ओळींचा ‘बायबल' ग्रंथाचा मजकूर हे यंत्रावर छापले केलेले आदिमुद्रित होय. टंक (मुद्राक्षरे) मुद्रणपद्धती (Paper to Print) यंत्रामुळे अस्तित्वात आली. या शतकाच्या उत्तरार्धात मुद्रण यंत्राचा अधिक विकास होत गेला. गेल्या ६०० वर्षांत मुद्रण स्वयंचलित होत आज ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे संगणकीय कार्यक्रमाधारित छपाई, बांधणीसह पूर्ण पुस्तक तयार करणारे ‘मागणी तसा पुरवठा' (Print n Demand) करणारे यंत्र बनले आहे.
 अक्षर जुळणी, छायाचित्र छपाई, शिलामुद्रण (लिथोग्राफी), इलेक्ट्रोप्लेटिंग, लेसर, रोटरी, प्रतिरूप मुद्रण (ऑफसेट), चेक, नोट छपाई यंत्र, ओसीआरयुक्त छपाई अशी रोज नव्या तंत्रज्ञानाची मुद्रण यंत्रे वापरात येत आहेत. कागद, मुद्रण ते पुस्तक (Paper to print) अशा सर्व क्रिया सलग व एकत्र करणाच्या यंत्रशोधामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय मुद्रणाची कल्पना आज मूर्त झाली आहे. मुद्रण आता रंगीत झाले आहे. वृत्तपत्रे, प्रकाशने, उद्योग, बँका, विमा जीवनाची सर्व क्षेत्रे मुद्रणांनी व्यापली आहेत, ती इतकी की माणूस आता सहीऐवजी परत अंगठा करू लागला. तोपण ई-अंगठा झाला आहे.

 पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके, जाहिराती, पाठ्यपुस्तके, धनादेश (चेक), ओळखपत्रे, शीर्षपत्रे (लेटरपॅड्स) ही नित्याची गोष्ट झाली आहे.

वाचन/५३