पान:वाचन (Vachan).pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४.४.४ एकविसावे शतक
 मुद्रित पुस्तकांची जागा किंडलने घेतली. ऑनलाइन प्रकाशन व विक्रीस गती आली. मुद्रितबरोबर अंकीय आवृत्ती प्रकाशन समांतर होत पुस्तके मुक्त रूपात ज्ञानप्रसारक झाली. कट, पेस्ट, डाऊनलोडने लेखन, वाचन प्रक्रिया स्मरणाकडून संग्रहाकडे नेली. ‘संदर्भापुरते वाचन' असा वाचनाचा नवा तत्पर (Instant) प्रकार अस्तित्वात आला. मोबाईल, लॅपटॉप, वायफाय सुविधेने वाचन हे व्यक्तीसुलभ बनले. मुद्रण व्यवसायात POD यंत्रे (Print On Demand) अस्तित्वात आल्याने प्रकाशन, मुद्रण व्यवसाय संग्रहमुक्त झाला. आता साठा करून ठेवून विकण्याची पद्धत संपून आदेशानुसार मुद्रण प्रकाशन, स्वयंअर्थशासित प्रकाशन (Self publishing) मुळे प्रकाशकाचा एकाधिकार व नियंत्रण इतिहासजमा झाले. सी.डी. रॉम, कॅसेट्स, क्लिप्स, व्हिडिओ टेप्स, ऑडिओ टेप्स इ.द्वारे पुस्तके दृकश्राव्य बनली. पाहणे, ऐकणे वाचनाचे पर्याय बनले. वाचन संस्कृतीचा -हास होत असल्याची हाकाटी ऐकू येणे याला खरे तर मुद्रण, लेखन, प्रकाशन, वाचनाच्या स्वरूपाचा कायाकल्प म्हणून पाहायला हवे. गतीने उसंत गमावली हे वाचन कमी होण्याचे खरे कारण होय. ग्रंथ वाचन हा कधी काळी शिळोप्याचा उद्योग होता. तो त्या स्वरूपात राहिला नाही हे खरे; पण वाचनाचे स्वरूप बदलले याची नोंद घ्यायला हवी.
जगातला पहिला ग्रंथ
 जगातील आद्यलिखिताचा नमुना म्हणजे आदिमानवाने दगड, खडकांवर ओढलेले ओरखडे, रेघा नि कोरीव चित्रे होत. त्यानंतर माणसाने प्रयत्नपूर्वक केलेले लेखन म्हणजे ठशा, ठोकळ्यावर नोंदविलेल्या गोष्टी. असे काही लेखनाचे आद्यठसे बगदादच्या पुरातत्त्व संग्रहालयात आपणास पाहावयास मिळतात. त्यांचा काळ इ.स. पूर्व ४००० वर्षे सांगितला जातो. नंतरच्या काळात माणसाने अशा विटा, ठोकळे, ठसे दीर्घजीवी जपता यावेत म्हणून लिहिल्यानंतर ते भाजून (Baked) सुरक्षित राहतील असे पाहिले. अशी भाजलेल्या विटांची पुस्तके (Clay Books) असत. सर हेन्री लेयार्ड यांनी कॅलडा (बॅसिलोनिया) येथील उत्खननात अशी काही पुस्तके जमा केली आहेत. ती आता ब्रिटिश म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या प्राचीन लेखन नमुन्यातील एक म्हणून याचे असाधारण महत्त्व आहे. त्यावर पुराची माहिती नोंदवलेली आहे.


https://enwikipedia.org/wiki/Book

वाचन/५१