पान:वाचन (Vachan).pdf/50

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लाकडी कारागिरीच्या नमुन्याच्या सुबकतेवर पुस्तकाची प्रत(दर्जा) ठरविली जात असे. ठसा पुस्तके (Block Books) म्हणून ही हस्तलिखिते ओळखली जायची. युरोपमध्ये या कलेचा प्रसार इ.स. १४०० मध्ये झाला. त्यातून पत्ते, धार्मिक चित्रे यांचे उत्पादन पुढे सुरू झाल्याचे दिसून येते. बी शेंग या चिनी संशोधकाने या पद्धतीतून सुटे ठसे (Movable Types) निर्माण केले. ते प्रारंभिक टंक (Fonts) होत. गटेनबर्गने मग लोखंडी टंक निर्माण करून नि मुद्रणयंत्र शोधून काढून मुद्रणकलेचा प्रारंभ इ.स. १४५० मध्ये केला. त्यामुळे पुस्तकांची किंमत स्वस्त होण्यास जसे सहाय्य झाले तसे पुस्तकांच्या हव्या तितक्या प्रती अल्पकाळात निर्माण करणे नित्यक्रम होऊन गेले. मुद्रणकलेने ग्रंथक्रांती घडवून आणली.
४.४.२ एकोणिसावे शतक
 एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात वाफेवर चालणारी मुद्रण यंत्रे अस्तित्वात आली. ही यंत्रे दर ताशी ११०० पानांची छपाई करीत; पण कामगारांना या गतीने मजकुरांची जुळणी करणे अवघड जात असे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मोनोटाइप आणि लिनोटाइप मुद्रण यंत्रांचा शोध लागून मुद्रण पूर्वीपेक्षा गतिमान व सुबक बनले. ६००० अक्षरे जुळणी करून छापणे शक्य झाल्याने मुद्रणाची गती तिपटीने वाढली. शिवाय मुद्रण, प्रकाशनावरील पूर्वापार बंधने शिथिल झाल्यानेही पुस्तक प्रकाशनांची संख्या अनपेक्षितपणे वाढली. बौद्धिक संपदा कायदा (Intellectual property Act), मुद्रण स्वांतत्र्य (Freedom of Press), बंधमुक्त प्रकाशने (Public Domen) , मुद्रण हक्क (Copy right) इत्यादी सुधारणांमुळे ग्रंथ मुद्रण, प्रकाशनास शिस्त येऊन ते नियंत्रित झाले.
४.४.३ विसावे शतक

 या शतकात एकामागून एक गतिशील व सुबक मुद्रण करणारी यंत्रे विकसित झाली. ट्रेडल, लिथो, सिलिंडर, ऑफसेट, रोटरी, डिजिटल प्रिंटर इ.मुळे विसाव्या शतकाच्या (मुद्रणयंत्र व मुद्रणालय छायाचित्र पाहा) मध्यास २ लाख पुस्तके प्रकाशित व्हायची. त्यांची संख्या शतकाच्या शेवटी किमान पाच पट वाढल्याचे दिसून आले. माहितीचा विस्फोट एकीकडे तर दुसरीकडे माहिती व तंत्रज्ञान युग यांच्या दुहेरी विकासाचा लाभ व परिणाम म्हणून पुस्तकांचा महापूर लोटला. पुस्तकांची दुकाने, प्रकाशन गृहे, ग्रंथालये यांतील व्यवस्था कोलमडून पडावी असा हा काळ!

वाचन/४९