पान:वाचन (Vachan).pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४.३ ग्रंथ : स्वरूप आणि व्याप्ती

  ग्रंथांच्या शास्त्रीय परिभाषा ह्या त्यांचं भौतिक रूप प्रगट करणाच्या असतात. परंतु, पुस्तकांसंबंधी लेखक, कवी, समीक्षक जेव्हा बोलत, लिहीत असतात, तेव्हा त्यातून ग्रंथांचं कार्यरूप कळण्यास मदत होते. "Room without book is a body without soul' म्हणत सिसेरो पुस्तकांची तुलना आत्म्याशी करत घराचं सुसंस्कृतपण ग्रंथांशी निगडित करतो. ऑस्कर वाइल्डनी पुस्तकं वारंवार वाचली गेल्यानं ती आपणास कशी समृद्ध करतात, हे सांगितलं आहे. त्यातून तो पुस्तकास मानवी संस्काराचे साधन मानतो, हे स्पष्ट होते. अर्नेस्ट हेमिंग्वे पुस्तकास जिगरी दोस्त मानतो नि म्हणतो की, "There is no friend as loyal as book.' असं म्हणत तो "Friend in need is friend indeed.' हेच अधोरेखित करतो. पुस्तक जीवनाच्या चांगल्या, वाईट काळात जी सोबत करतात, ती पाठीवरच्या भावा-बहिणीसारखी नि जिवलग मित्रांसारखी नक्कीच जन्मभर साथसंगत करीत राहतात. थॉमस जेफरसननी तर म्हणून ठेवलं आहे की, "I Cannot live without book.' जीवन व पुस्तके परस्परपूरक असतात हेच खरे. 'हॅरी पॉटर' लिहिणाऱ्या जे. के. रोलिंग या विदूषीनं पुस्तकाची तुलना आरशाशी करत म्हटलं आहे की, "Books are like mirrors; if a fool looks in, you cannot expect a genius to look at.' पुस्तकाचं शहाणपण वाचणाऱ्याच्या शहाणपणावर अवलंबून असते. खडे, धान्य टिपणारी कोंबडी मोतीपण खड्यासारखी गिळते; पण रत्नपारखी स्फटिक व हिरा वेगळा करतो. पुस्तकं माणसाचा कायाकल्प घडवून आणतात हे खरं आहे; पण ते समजायचं तर तुमचीसुद्धा सकारात्मकता हवी. पुस्तकांचेही अनेक प्रकार असतात. रंजक, बोधक, प्रणयी, भयावह, संस्कारी, दृष्टिदायक इ. तशीच काही अभिजातही असतात. ती वाचून संपविता येत नाहीत नि संपतही नाहीत. इटॅलो काल्विनोने "The use of Literature' ग्रंथात नमूद केले आहे की, "A classic is a book, that has never finished what it has to say. ती आयुष्यभर आपली पाठराखण करतात, तसाच पाठपुरावाही. म्हणून ग्रंथांची पारायणं करायची नि पुस्तकं वाचत, पचवत जायची. जीवन सभ्य, समंजस, सहिष्णू, सदाचारी, सत्शील बनवायचं तर पुस्तकांना पर्याय नाही.

वाचन/४२