Jump to content

पान:वाचन (Vachan).pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्राप्त पुराव्यांच्या आधारे लक्षात येते की, ब्राह्मी लिपी भारतातील सर्वाधिक प्राचीन व आरंभिक लिपी होय. सम्राट अशोकाच्या शिलालेखातील खरोष्ठी लिपी आणि ब्राह्मी लिपीत साधर्म्य दिसून येते. ब्राह्मी लिपीच्या दोन शैली विकसित झाल्या- १) उत्तरी शैली, २) दक्षिणी शैली.
३.३.४.१ (अ) उत्तरी शैलीतील लिप्या
१. गुप्त लिपी
 इसवी सनाची चौथी, पाचवी शताब्दी हा गुप्त साम्राज्य काळ म्हणून ओळखला जातो. या काळात प्रचलित असलेली लिपी 'गुप्त लिपी' म्हणून ओळखली जाते. गुप्तकालीन शिलालेख, हस्तलिखितांमध्ये ही लिपी आढळते.
२. कुटिल लिपी
 गुप्त लिपीपासून कुटिल लिपीचा जन्म झाला. पुढे शारदा आणि देवनागरी लिपींचा विकास याच लिपीतून झाला. सहाव्या शतकापासून ते नवव्या शतकापर्यंत कुटिल लिपी अस्तित्वात होती. ३. नागरी लिपी
 ही लिपीच आज देवनागरी लिपी म्हणून ओळखली जाते. संस्कृत भाषेस ‘देवभाषा' (अपौरूषेय) मानले जाते. देवभाषेची लिपी (नागरी) म्हणून देवनागरी' शब्द अस्तित्वात आला. नवव्या शतकात ही लिपी उत्तर भारतात प्रचारित, प्रसरित झाली होती. इसवी सनाच्या आठव्या शतकात तिचा फैलाव दक्षिणेत झाला. करवीर संस्थान (कोल्हापूर)च्या दानपत्रात या लिपीचा वापर दिसून येतो. त्या काळात दक्षिणेत ही लिपी ‘नंदीनागरी' म्हणून ओळखली जायची. या प्राचीन नागरी लिपीतूनच बंगाली, कैथी, मुंडा, महाजनी, राजस्तानी, गुजराती लिपींचा उगम झालेला दिसून येतो.
 ४. शारदा लिपी काश्मीर, पंजाब, तसेच उत्तर पश्चिमी भारतातील प्रदेशात शारदा लिपी वापरात होती. इसवी सनाच्या दहाव्या शतकात शारदा लिपीचा उगम कुटिल लिपीतून झाला. टाकरी, गुरूमुखी लिप्या शारदा लिपींतून उदयास आल्या.
 ५. बंगाली लिपी

नागरी लिपीची पूर्व शाखा म्हणून बंगाली लिपी ओळखली जाते. आज मैथिली, ओडिआ लिप्या बंगाली लिपीतून जन्मल्या असे मानले जात असले, तरी तिचा मूलाधार नागरी लिपीच आहे, हे आपणास विसरून चालणार नाही.

वाचन/३४