पान:वाचन (Vachan).pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

३.३.३ लिपी विकास
 मानव विकासाच्या इतिहासातून प्राचीन संस्कृती आपल्या लक्षात येते. लिपी कालसाधन असली तरी ती कालनिहाय विकसित होत राहिल्याचे दिसून येते. हजारो, लाखो वर्षे त्यासाठी माणसास खर्च करावी लागली. गुणाकर मुळे यांनी म्हटल्याप्रमाणे, “पृथ्वीवरील माणसाच्या अस्तित्वाचा इतिहास दहा लाख वर्षांचा आहे. पाच लाख वर्षांपूर्वी तो दगडाचा हत्यार म्हणून (शिकार, कोरणे, लिहिणे) वापर करत आला आहे. आगीचा शोध लागला होता नि माणसाने भाषेस जन्म दिला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार सुमारे १० हजार वर्षांपूर्वी माणसाने अंकांचा शोध लावला होता नि अक्षरांचापण. लिपी इतकी जुनी, प्राचीन आहे. सुमारे ६ हजार वर्षांपूर्वीच्या ताम्रयुगात सिंधु, मेसापोटामिया, इजिप्त, चीन संस्कृती अस्तित्वात होती. त्या काळात चित्रलिपी हीच माणसाची भावलिपी होती. सुमेरी लिपी अस्तित्वात होती. मोहों-जो-दडो, हडप्पा संस्कृती उत्खननातील प्राप्त साधनातून सिंधु संस्कृतीची माहिती आपल्या हाती लागली.
 इसवी सन पूर्व १२०० च्या सुमारास पश्चिम आशिया, इराण तसेच भारतातही अक्षरात्मक लिपी उदयास आली होती. लिपी विकासात सेमेटिक परिवाराचे मोठे योगदान लाभले आहे. इसवी सन पूर्व १००० वर्षांदरम्यान व्यंजने अस्तित्वात आल्याचं सांगितलं जातं. अरबी, हिब्रू, इ. सेमेटिक परिवारातील भाषा या व्यंजनांवर आधारित होत्या. फिनिशियन समुदायाच्या समुद्र पर्यटनाद्वारे ग्रीसमधून पश्चिमोत्तर भारतापर्यंत सेमेटिक परिवारातील वर्णमालेचा प्रचार, प्रसार झाल्याचे दिसून येते. इसवी सन पूर्व ६०० मध्ये सेमेटिक लिपीपासून अरमेनिअन लिपी उदयास आली. अरमेनिअन लिपीपासून इसवी सन पूर्व ५००-४०० च्या सुमारास खरोष्ठी लिपीचा उगम झाला. ही लिपी इराण आणि पश्चिमोत्तर भारतात प्रयोगित नि प्रचलित झाली. खरोष्ठी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. सम्राट अशोकाच्या शिलालेखात ही लिपी आहे.
३.३.४ भारतीय लिपी विकास

 पुरातत्त्व विशेषज्ञ सांगतात की, इसवी सन पूर्व १५०० च्या सुमारास सिंधु संस्कृती लोप पावली होती. त्यावेळी अस्तित्वात असलेली वैदिक परंपरा प्रामुख्याने श्रुतीआधारित (मौखिक, श्रवण नि स्मरणाधारित) होती.

वाचन/३३