पान:वाचन (Vachan).pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इ.स. पूर्व २५०० मधील सिंधू संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या मुद्रांवर आद्य लिखिताच्या खुणा/पुरावे आढळतात. त्यात प्राण्यांची चित्रे आढळतात. शिवाय काही चिन्हे त्यावरून त्या मुद्रा गणन सूचक आहेत, हे सिद्ध होते. त्यांचा वापर व्यापार, प्रशासनात होत असावा असे दिसते.
३.२ लिपीची उत्क्रांती
 माणसाचे पहिले लेखन हे चित्ररूप होते. त्याला जे व्यक्त करायचे असे ते शब्द नव्हते. होत्या त्या संकल्पना, विचार. तो ते चित्रातून व्यक्त करायचा. पुढे मग अनेक चित्र समुदायातून एक भाव, कल्पना व्यक्त करू लागला. नंतरच्या काळात माणसाने अनुभव व्यक्त करायचा सपाटा लावला. आज आपण वाक्प्रचार, म्हणींमधून सूचक, संघटित अनुभव व्यक्त करतो तसे त्याचे स्वरूप होते. आकारांना चिन्हांची सूचकता यातून मिळाली. चित्रही हळूहळू सूचक बनत गेली. पुढे चित्रांना चिन्हरूप (वर्ण, अक्षरमुळाक्षर) प्राप्त झाले. लिपी विकास खालीलप्रमाणे घडला-
१. चित्राक्षर पद्धती
सुबोध चित्रांद्वारे अभिव्यक्त होण्याची ही पद्धत. यातून सरळ एखादी वस्तू, व्यक्ती, प्रसंग इत्यादी (Object) व्यक्त केले जायचे. यात खालील प्रकार असत-
(अ) स्मरण चिन्हे (Mnemonic) - काही गोष्टी नोंदून ठेवण्यासाठी रेखा अथवा चित्रे.
(ब) चित्राक्षरे (Pictoric) - स्मरण चिन्हातून वस्तू, व्यक्ती सूचित व्हायची, तर चित्राक्षरातून क्रम, सूचन, वहन, पर्यावरणीय संपर्क/संबंध, शीर्षके, नावे, धार्मिक संकेत, रीती, चरित्र इत्यादी व्यक्त करण्याची क्षमता असायची.
(क) सूचकचित्रे - संकल्पना, विचार व्यक्त करणारी गूढ चित्रे.
२. संक्रमण / वहन पद्धती - शीर्षकासह चित्राभिव्यक्तीची पद्धत.
३. चिन्ह पद्धती-ध्वनी, अक्षर, वर्ण, व्यक्त करणारी चिन्हे/अक्षरे ती ध्वनीसूचक, सांकेतिक वा वर्ण असत.

 या सर्व प्रक्रियेतून प्रारंभिक लिपी विकास घडून आला. भाषानिहाय हा विकासक्रम, काळ वेगवेगळा असला तरी सर्वसाधारणपणे अशा अवस्थांमधून संक्रमण होत भाषांच्या लिप्या तयार झाल्याचे दिसून येते.

वाचन/२८