पान:वाचन (Vachan).pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सांस्कृतिकदृष्ट्या समान घडणीच्या लोकसमूहाची जीवनशैली लोकसाहित्यातून अभिव्यक्त होत असते. त्यामागे सामूहिक अबोध प्रेरणा कार्यरत असतात. त्यामुळे लोकसाहित्य आपोआप जन्मते. ते कवितेसारखे उत्स्फूर्त असते. त्याच्या निर्मितीच्या प्रेरणा व्यक्तिगत असल्या तरी लक्ष्य समाज असतो. ती समूह संपदा असते. जतनही समुदायच करतो. हे साहित्य ऐकीव, मौखिक स्वरूपात ठेवा, वारसा म्हणून एका पिढीकडून दुस-या पिढीकडे जात राहते.

 लोकसाहित्य पूर्वापार चालत येते. त्यावर अभिजात साहित्याचा प्रभाव असला तरी पिढीगणिक त्यात प्रक्षिप्त, घट, भर होत राहते. लोकसाहित्याचे हे रूप लक्षात घेऊन लोकसाहित्य अभ्यासकांनी त्यास लोकवाङ्मय, लोकसाहित्य, लोकवार्ता, लोकविद्या, लोकायन, लोकायत असे अनेक शब्द वेळोवेळी वापरले आहेत. हे सर्व लोकसंस्कृतीचे अंग असते.

वाचन/२१