Jump to content

पान:वाचन (Vachan).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२. लोकसाहित्य : उगम आणि विकास इंग्रजीत प्रचलित असलेल्या 'Folklore' शब्दास मराठीत लोकवाङ्मय, लोकसाहित्य असे शब्द रूढ आहेत. मूळ इंग्रजी शब्दातील 'Folk' शब्द अविकसित काळातील लोकसमुदाय, समाज सूचित करणारा आहे. त्यातील दुसरा शब्द 'Lore' म्हणजे विशेष ज्ञान, वाङ्मय, साहित्य अशा अर्थाचा आहे. लेखनपूर्व काळातील म्हणजे इ.स. पूर्व ३००० ते ४००० वर्षांपूर्वीचे साहित्य ऐकीव, वाचिक होते, त्या अर्थाने ते ‘लोकवाङ्मय' (Folklore) होते. लेखन परंपरा विकसित झाल्यावर पूर्वसुरींनी आपले लोकवाङ्मय संकलित, संपादित करून मुद्रित रूपात प्रकाशित केले, ते लोकसाहित्य (Folk Literature) बनले; पण ते मूलत: लोकवाङ्मयच होय.

 लोकवाङ्मय हा प्राचीन साहित्याचा कलात्मक आविष्कार होय. याचा सर्वप्रथम विचार मानववंशशास्त्र, समाजशास्त्र इत्यादींमध्ये मानव विकासाच्या अभ्यासाचे साधन म्हणून झाला. आज जगभर जे लोकवाङ्मय उपलब्ध आहे, ते कथा, गीते, उखाणे, पोवाडे, ओव्या, कोडी, रूपके इत्यादी रूपात दिसून येते. म्हणी, वाक्प्रचार, बोधकथा, मिथक हा त्याचाच भाग होय. 'लोक' हा शब्द प्राचीन, निरक्षर जनसमुदाय सूचक होय. भारतात तो त्रिलोक कल्पना (पृथ्वी, स्वर्ग, पाताळ) अस्तित्वात आल्यापासून वापरात आहे. डॉ. श्याम परमार यांनी म्हटल्याप्रमाणे, लोक' साधारण जनसमाज है, जिसमें भूभाग पर फैले हुए समस्त प्रकार के मानव सम्मिलित है। यह शब्द वर्गभेदरहित, व्यापक एवं प्राचीन परंपराओं की श्रेष्ठ राशिसहित अर्वाचीन सभ्यता, संस्कृति के कल्याणमय विवेचन का द्योतक है। ‘लोक' हा शब्द नागरपूर्व समाज, साहित्य सूचक होय.

वाचन/२०