मनुष्य अन्य प्राण्यांपेक्षा (हत्ती, वाघ, सिंह इ.) दुर्बल असूनही तो श्रेष्ठ ठरतो, ते त्याच्या बुद्धी व युक्ती सामर्थ्यांमुळे.हे सामर्थ्य माणूस काळाच्या ओघात विविध, कौशल्यांच्या आधारे सतत विकसित करत आला आहे. माकड वंशातून माणूस वेगळा झाला, तो झाडावरून जमिनीवर राहू लागला म्हणून नाही, तर चार पायांवर चालणारा वनमनुष्य (चिंपाझी, गोरिला) दोन पायांवर चालू लागल्याने. तो हातांच्या बोटांचा वापर निर्मितीसाठी करू लागला. त्याच्या मेंदू विकासामुळे त्याला भाषिक कौशल्य आणि सामर्थ्य लाभले. या बळावरच तो अन्य प्राण्यांपेक्षा वेगळा जसा ठरला तसा
श्रेष्ठही.
'Man is a social animal' अशी त्याची व्याख्या करणारे समाज वैज्ञानिक त्याच्या समूहवृत्तीसच अधोरेखित करत असतात. पूर्वी टोळ्यांमध्ये राहणा-या माणसाने स्वत:चे कुटुंब बनविले तसा समाजही. जसा समाज साकारला तशी त्याला संपर्क, संवादाची गरज निर्माण झाली. प्राणी, पक्षी, जीवजंतू सर्वांच्या जीवनात आचाराची परंपरा आणि परिपाठ असतो. हत्ती, मुंगी, बगळे, मासे, खेकडे सर्वांच्या जीवनाचे निरीक्षण करा. काय दिसते? तर त्यांचे जीवन नियमचक्र नि कर्मकांडांनी बद्ध असते. माणूस याला छेद देऊन जगतो म्हणून निराळा. वाचा आणि ध्वनी यांच्या संतुलित सामर्थ्याने त्याने भाषा निर्मिली. भाषेमुळे तो समाजशील बनला. मूक प्राण्याचा बोलका माणूस बनणे, ही त्याची वांशिक उत्क्रांती होय.
वाचा नि ध्वनीचे विनिमय सामर्थ्य सर्व प्राण्यांमध्ये आढळते. कुत्र्याचे भुंकणे, गाईचे हंबरणे, सापाचा वा नागाचा फुत्कार, वाघाची डरकाळी, पक्ष्यांचा कलकलाट या साऱ्या गोष्टींतून प्राणी हर्ष, शोक, भय, आनंद इत्यादी भाव व्यक्त करत असतात. माणसाचे वेगळेपण अशात आहे की, त्याने या ध्वनी संकेतांना चित्र, चिन्ह्यांद्वारे सांकेतिक अर्थ देऊन संवादाचे सशक्त साधन बनविले आहे. त्यातून ज्ञानग्रहण व संप्रेषण सुबोध बनले. अर्थवाही वाचा व्यवस्था, लेखन, वाचन ही मानवनिर्मित गोष्ट होय. यातून मानव संस्कृती उदयाला आली. समाज, संस्कृती संवाहक भाषा म्हणजे मन्वंतर, युगांतर, परिवर्तन, कायाकल्प, विकास यांकडे टाकलेलं पुढचं पाऊल होय.
भाषा ही विकास, ग्रहण, वापर अशी त्रिविध संपर्क, क्षमता, संवादाची गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यातील शब्दांना केवळ अर्थ असत नाही, तर तो ज्ञान आणि अनुभवजन्य संकेत असतो.