पान:वाचन (Vachan).pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याला नंतर कोरणे, चित्र, ध्वनी इत्यादींमुळे सांकेतिक रूप प्राप्त झाले. नित्य भाषिक, वाचिक उद्गारांना चित्र, चिन्हांची जोड लाभली. बोली भाषा झाली म्हणजे संकेतांना सार्वत्रिक व्यवहार मान्यता नि अनुकरणाने समाज मान्यता मिळाली. तीच गोष्ट चिन्ह, चित्रांची. अशाच प्रक्रियेतून लिपी जन्मली. पुढे वाङ्मयाचे रूपांतर साहित्यात झाले.
  माणसाचा हा सर्व जीवन व्यवहार, व्यापार वाढत्या विस्ताराने व्यापक व गुंतागुंतीचा होत राहिला. त्यातून अंत:प्रत्ययास येणारे भाव, विचार अधिक गुंतागुंतीचे होत गेले. अंत:प्रत्ययातील गोष्टी सारभूतरीत्या निरंतर व्यक्त करत राहणे त्याची गरज बनली. हे व्यक्त होणं अधिक मनस्वी करण्याच्या माणसाच्या ध्यास, धडपडीने ध्वनीला नाद, ताल, संगीताची जोड दिली. हावभाव अधिक लयबद्ध करण्यातून नृत्य, नाटक, अभिनयाचा तसेच संगीताचा जन्म झाला. चित्रांचे, शाईचे एकरूप माध्यम असलेला निसर्ग जसाच्या तसा प्रतिबिंबित करण्यातून सप्तरंग जन्माला आले. चित्रं रंगीत झालीत. ती अधिक सजीव करण्याच्या ध्येय आणि ध्यासातून शिल्प जन्मले. शिळा, डोंगर, गुंफांचे मऊ आणि कठीण कातळ कोरून, खोदून, फोडून तो त्यांना आकार देऊ लागला म्हणजे आपलीच प्रतिकृती, प्रतिबिंब बनवू लागला. पूर्वी वस्तीच्या तोंडावर, वेशीवर असलेल्या बृहशिळा वस्तीचे रक्षण करतात म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करत, पूजा करत त्यातून देव आणि दैत्य जन्मले, ते भय दूर करण्याच्या निरंतरतेतून. ही निरंतर कर्मपूजा भक्ती बनली.

 युद्ध, संघर्ष, नैसर्गिक आपत्ती इत्यादींमध्ये असुरक्षित भावनेच्या वेळी आधार देणारे हे घटक त्याच्या जीवनाचा परिपाठ बनला. विचार, कृती, भाषा, लेखन, भजन, नृत्य, नाटकांतून व्यक्त होणा-या माणसाने भाषा आत्मसात करून ती स्थिर व सार्वत्रिक करण्याच्या गरजेतून वापराचे नियम बनविले. त्याचे व्याकरण झाले. रेषा, रफार, वेलांटी, उकार, लपेटीतून लिपीचा उगम झाला. मौखिक असलेले लोकवाङ्मय लिखित साहित्य बनले ते लिपीच्या वरदानामुळे. भाषा, लिपीस वैविध्य लाभले ते प्राकृतिक, सांस्कृतिक वैविध्यामुळे. निसर्ग, ऋतू, प्रदेश वैभिन्यातून भाषा व लिपीची विविधता जन्माला आली. वैचित्र वैभव बनले. वैविध्यानेच एकतेची हाक दिली. एकीकडे माणूस विकसित होत राहिला, तर दुसरीकडे एकात्म, अंतर्मुख आणि कलात्मकही!

वाचन/१२