पान:वाचन (Vachan).pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१. माणसाचं व्यक्त होणं

१.१ आविष्कार, अनुभूती आणि अभिव्यक्ती
पार्श्वभूमी
 माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये अंतर निर्माण करणारे जे अनेक घटक आहेत, त्यात भाषा, हास्य, विचार, बुद्धी, अभिव्यक्ती नि आविष्कार इत्यादी घटकांचा समावेश होतो. माणसाचा विकास ही निरंतर प्रक्रिया होय. मनातलं व्यक्त करण्याची ओढ त्याच्यात निर्माण झाली ती व्यक्त होण्याच्या अंत:स्फूर्त ऊर्जा नि उर्मीतून. विकासकाळात शिकारीसाठी बनविलेले टोकदार दगड, बाण, भाले इत्यादी अस्त्र, शस्त्रांचा प्रयोग तो जंगलातील भटकं जीवन सोडून गुहा, गुंफेत राहू लागला, तेव्हा तो मनातले भाव, विचार, अभिव्यक्त करण्यासाठी करू लागला. मऊ पृष्ठांवर कोरून,

ओरखडण्यातून तो स्वत:ला व्यक्त करू लागला. गुंफेत अग्नीचा प्रवेश झाला, तेव्हा कितीतरी गुंफा या काळाच्या ओघात कोरलेल्या, चित्रित केलेल्या आढळल्या. माणसाला व्यक्त होण्याची आवश्यकता जीवन व्यवहारात वाढू लागली ती त्याचं जीवन स्थिर होऊन तो शेती, व्यापार करू लागला, समूह जीवन स्थिर झालं तेव्हा. संवाद, देवाण-घेवाण ही त्याची सांस्कृतिक आणि सामाजिक गरज बनत गेली. कोरण्या, चितारण्यातली मनस्विता हा कधी काळी त्याचा व्यक्तिगत नि एकांत उपक्रम, आविष्कार होता. त्याला देहबोली लाभली ती संवाद, संभाषण, संप्रेषण इत्यादी गरजांतून. मग देहबोलीतील क्रियेबरोबरच समांतरपणे वाचिक संवाद करू लागला. विशेषतः शिकार, शेती करत असण्याच्या काळात किंवा तत्पूर्वी जंगलात टोळी करून राहात असतानाही तो हर्ष, शोक, भय इत्यादी भावना व्यक्त करण्यासाठी पुकारा, आरोळी, आक्रोश, क्रंदन, हास्य, छाती बडवून घेणं, मौन पाळणं इत्यादी क्रिया त्याच्या नित्य प्रतिसाद नि प्रतिक्रियांचा भाग होताच.

वाचन/११