पान:वाचन (Vachan).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाचनातून घडणाच्या शिक्षण, ज्ञानप्रसार, माहिती प्रसारण, विचार विस्तार यांची प्रचिती आपणास व्यक्तीघडण, विकासातून येते, तशी ती समाज जागृतीतूनही प्रत्ययास येत असते. वाचन संस्कृतीतून वाचकाचा वृत्ती विकास घडून तो प्रगल्भ, कुशाग्र नागरिक बनतो. मानवी मूल्यांचे बीजारोपण करण्याचे महत्त्वाचे कार्य वाचन संस्कृतीतून होते. वाचन संस्कृती भौतिकापेक्षा अभिभौतिक गोष्टींचा विकास घडवून आणत असल्याने समाज विकासात या संस्कृतीचे योगदान असाधारण ठरते. वाचन संस्कृती सुशिक्षित जीवनशैलीचा मार्ग आखून देत असल्याने ती मानवी बदलाचे मोठे साधन बनून समोर येते. मानव संसाधन विकासाचे माध्यम म्हणून वाचन संस्कृतीकडे पाहता येते. ही संस्कृती आदर्श केंद्री असते. तिचे लक्ष्य नेहमीच विधायक राहात आले आहे. मानवी विकासातून समाज स्थित्यंतर आणि परिवर्तन हा या संस्कृतीचा मोठा पायाच होय. मानवी समाज जीवनात स्वातंत्र्य, बंधुता, समता, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीसारख्या जीवनमूल्यांची पेरणी वाचन संस्कृतीतून । होत राहिल्याने समाज पुरोगामी होतो. भाषा, साहित्य, लिपी इत्यादींचा विकास हे तर वाचन संस्कृतीचे प्रमुख कार्य. ते ती विविध उपक्रमांतून (लेखक, मुलाखत, साहित्य चर्चा, अभिवाचन इत्यादी) घडवून आणते. भारतासारख्या बहुभाषी, बहवंशीय, बहुसांस्कृतिक देशात वाचन संस्कृती एकात्मता, सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव निर्माण करण्याचे कार्य म्हणजे राष्ट्रीय कर्तव्यपरायणताच नव्हे का? A society is organised group of individuals. A culture is an organised group of learned responses. The individual is living organism capable of independent thought feeling and action, but with his independance limited and all his resources profoundly modified by contact with the society and culture in which he develops. राल्फ लिंटनचे हे विचार वाचन संस्कृतीस पूरक आहेत.
५.११ वाचनाचे महत्त्व

 जीवनात वाचनाचे असाधारण महत्त्व असते, ते वाचनामुळे माणूस आणि जग बदलते म्हणून. वाचन केवळ लिखिताचं उच्चारण असत नाही, तर तो बुद्धी, तर्क, भावना, स्मरण, भाषा, लिपी, आकलन इत्यादींचा सुमेळ असतो. वाचनामुळे मनुष्य भावसाक्षर होतो तसा ज्ञानसंपन्नही! वाचनामुळे जीवनाकडे विधायक दृष्टीने पाहत माणूस आतून, बाहेरून बदलून जातो. परिवर्तनाची, वाचनाची जी ऊर्जा नि शक्यता असते, त्यामुळे वाचनाचे महत्त्व आहे.

वाचन/१०१