पान:वाचन (Vachan).pdf/101

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


५.१०.२ वाचन संस्कृती
 संस्कृती म्हणजे रीतिरिवाज, परंपरा, प्रवृत्ती, कसोट्या, कल्पना, प्रतीके इत्यादींद्वारे समाज व व्यक्ती व्यवहाराचे व्यवस्थापन आणि नियंत्रण होय. समाजातील व्यक्ती या सर्वांचे पालन करून त्यांना एकप्रकारे मान्यताच देत असतात. एखाद्या व्यक्तीस जेव्हा आपण ‘सुसंस्कृत मनुष्य' अथवा ‘उच्चभ्रू' (High Brow) अशी संज्ञा देतो, तेव्हा त्याचा अर्थ ती व्यक्ती सांस्कृतिक परंपरांचे काटेकोर पालन करणारी म्हणून त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख करत असतो. वाचन संस्कृतीतही हे अभिप्रेत असते. वाचन संस्कृतीचा सदस्य समाज साक्षर असतो. त्यास सुशिक्षित, प्रगल्भ करणे हे वाचन संस्कृतीचे ध्येय असते. वाचन संस्कृतीची व्याख्या करताना म्हटले गेले आहे की, 'Reading culture is a climate in which all the society is expected and encouraged to read.'
 वाचन संस्कृतीत वाचनसापेक्ष सकारात्मक वातावरण निर्मितीस असाधारण महत्त्व असते. वाचन संस्कृतीचे कार्य नवोदित वाचक पिढीस वाचन संस्कार देणे, रुजविणे असते. तिचा प्रारंभ वाचनाचे प्राथमिक धडे देण्यातून होतो. वाचन संस्कृती ही निरंतर विकसित होणारी अशी समाजव्यवस्था आहे. लेखक, वाचक, विद्यार्थी, शिक्षक, पालक, प्रकाशक, माध्यमे, ग्रंथालये, समाजातील सर्व घटक तिचे स्वयंभू सदस्य असतात. वाचन संस्कृती टिकावी म्हणून शाळा, महाविद्यालये, माध्यमे, प्रकाशन, शासन, ग्रंथालये सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. वाचनालय चालविणे, ग्रंथालय सुविधा उभारणे, चर्चासत्रे, वाचक मेळावे, पुस्तक जत्रा, पुस्तक प्रदर्शने, ग्रंथोत्सव, पुस्तक प्रकाशन समारंभ योजणे, वाचन-लेखन स्पर्धांचे आयोजन यांतून वाचन संस्कृतीच्या प्रचार, प्रसारास बळ मिळत असते. भाषांतर, समीक्षणे, संपादन, प्रकाशन, अभ्यास, संशोधन यांतून वाचन संस्कृती नवा चेहरा नित्य धारण करीत असते. वाचन संस्कृतीतूनच सुशिक्षित समाज निर्माण होतो. वाचनाची आवड, सवड आणि सवय निर्माण करणे हे वाचन संस्कृतीचे मूळ कार्य होय.

 वाचन संस्कृती केवळ वाचन संस्कारच रुजवत नाही, तर वाचन प्रक्रिया, वाचन पट, वाचन वेग इत्यादींबद्दल वाचकांत जाणीवजागृती निर्माण करून वाचन निर्दोष व कौशल्यपूर्ण बनविण्याचा प्रयत्न करत असते. वाचन साक्षरता प्रचार करण्याचे कार्य वाचन संस्कृतीतून घडत असते. संस्कृती ही तशी अदृश्य गोष्ट असली तरी तिचे परिणाम मात्र दृश्य नि अनुभवजन्य असतात.

वाचन/१००