पान:वाचन (Vachan).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्पर्धा यशस्वी झाली ती वाचनप्रेमी माझे शिक्षक मित्र, संस्थाचालक, पत्रकार,विद्यार्थी, पालक इ. सर्वांमुळे.
 डिसेंबर, २०१८ ला प्रकाशित होणारी तिसरी आवृत्ती सुधारित होय. पहिल्या दोन आवृत्तीतील दोषांचे निराकरण करण्यात आले आहे. काही नवीन, उपयुक्त मजकुराचा समावेश यात करण्यात आला आहे. त्यात ‘सृजनात्मक वाचन' या सर्वथा नव्या प्रकारावर विस्ताराने लिहिले आहे. प्राथमिक वा शालेय स्तरावर विद्यार्थी वाचनाचे पहिले धडे गिरवतो. ते वाचन अध्ययन (Learning to read) कसे घडते याचे विवेचन करण्यात आले आहे. अद्याप मराठीत वाचन शिकणे, शिकवणे या अंगांवर न विचार झाला, न अक्षर लिहिले गेले. ती उणीव भरुन काढण्याच्या हेतूने ‘वाचन : अध्ययन आणि अध्यापन' असा स्वतंत्र मजकूर अंतर्भूत केला आहे.
 पहिल्या दोन आवृत्त्यांत प्रकाशित वाचन सुभाषिते मराठी, हिंदी, इंग्रजी दिली गेली असली तरी ती मुख्यत: पाश्चात्य विचारक, साहित्यिक, समीक्षकांची होती. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये ‘वाचन' पुस्तकाचे पहिले परीक्षण लिहिणारे माझे स्नेही नि सन्मित्र डॉ. जी. पी. माळी यांनी ही गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली. त्या त्रुटीची पूर्तता या आवृत्तीत मराठी हिंदीतील एतद्देशीय साहित्यिक, समीक्षक, विचारक यांच्या सुभाषितांची भर घालून करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी ‘साप्ताहिक साधना'मध्ये परीक्षण लिहून ‘वाचन' पुस्तकाचा परिचय साऱ्या महाराष्ट्रास करून दिला याची नोंद घेऊन ‘वाचन'चा अंतर्भाव अनेक विद्यापीठे आपल्या अभ्यासक्रमात करत आहेत, ही स्वागतार्ह बाब होय. लवकरच या सुधारित आवृत्तीचे भाषांतर हिंदीत राजकमल प्रकाशन समूहाकडून व्हावे म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे वाचनाचा वैज्ञानिक विचार सर्व भारतीय भाषा आणि साहित्यातून होण्यास प्रारंभ होईल असा विश्वास वाटतो.

५ डिसेंबर, २०१८
- डॉ. सुनीलकुमार लवटे