पान:वाचन (Vachan).pdf/१७०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आहे. वाचनकौशल्यप्राप्तीनंतर प्रभावी वाचन कसे होते, ते होण्यासाठी कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात, या प्रश्नांची चर्चा डॉ.लवटे यांनी केली आहे. वाचन करून थांबायचे नसते, त्याचा पाठपुरावाही करायचा असतो कारण आपण वाचलेले आपल्या हाती लागायचे असल्यास हा पाठपुरावा अतिशय उपयुक्त असतो. त्यासाठी सारांशीकरण, क्रमवारी, अनुमान, तुलना, शंकानिरसन, अन्वये, मत वे वास्तव आणि इप्सित साध्यता या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. वाचनाचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये सहज वाचन, कटाक्ष वाचन, गतिमान वाचन, सोद्देश वाचन, व्यापक वाचन, सखोल वा प्रगल्भ वाचन यांचा समावेश होतो. अशा वाचनाच्या प्रकारांची थोडक्यात ओळख येथे करून देण्यात आली आहे.   ‘वाचन साक्षरता आणि संस्कृती' या मुद्यामध्ये डॉ.लवटे याना वाचनाच्या क्षमतेपासून चर्चेला सुरुवात करून आज संगणक, मोबाईलच्या काळात वाचन संस्कृतीच्या वाटचालीचा धावता आढावा घेतलेला आहे. आज वैज्ञानिक प्रगती, माहिती तंत्रज्ञानाचा झालेल्या विकासाने वाचनप्रक्रियेला नव्या टप्प्यावर आणले आहे. ऑनलाईन पुस्तके मागवून ती ऑनलाईनच किंवा किंडलसारख्या उपकरणावर वाचन करण्यापर्यंतचा वाचनाचा प्रवास येथे दिलेला आहे. परंतु ई-बुकचे फायदे सांगताना काही फसगतही झालेली आहे. उदाहरणार्थ, ते क्षणार्धात जगातून कुठूनही बसल्याजागी मिळवून वाचता येते व तेही मोफत सारख्या विधानांमध्ये थोडीशी फसगत दिसते. वास्तविक आपल्याला हवे ते पुस्तक ई-बुक स्वरूपात उपलब्ध असणे, ते मिळवण्यासाठी तांत्रिक सिद्धता आपल्याजवळ असणे आणि ते ऑनलाईन खरेदी करण्याची आपली कुवत असणे येथे महत्त्वाची गोष्ट आहे. ई-बुकही मोठी किंमत देऊन खरेदी करावी लागतात. शिवाय ती वाचनासाठी टॅब, मोबाईल, संगणक, लॅपटॉप सारख्या महागड्या उपकरणांची गरज असते. त्याचबरोबर ही माध्यमे इंटरनेटशी जोडलेलीही असणे आवश्यक आहे. शिवाय वीज ही या उपकरणाची मुख्य गरज आहे. त्यासाठी करावी लागणारी गुंतवणूकही नव्या काळातील या माध्यमांचा विचार करताना लक्षात घ्यायला हवी. त्यामुळे या माध्यमांच्या सामर्थ्याबरोबर मर्यादांचीही ओळख वाचकाना होणे आवश्यक आहे. याखेरीज या पुस्तकामध्ये जोडलेली परिशिष्टे अतिशय मौलिक आहेत. पहिले परिशिष्ट वाचकांचे हक्क याविषयी शंकांचे निरसन करणारे आहे. दुसरे युनेस्कोतर्फ प्रकाशित झालेल्या 'दि बुक चार्टर' या पुस्तिकेचा स्वैर अनुवाद

'ग्रंथ सनद' या नावाने दिला आहे.

वाचन/१६९