पान:वाचन (Vachan).pdf/१६५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


लेखनप्रक्रियेचा विकास, पुढे ग्रंथांची निर्मिती ते ग्रंथालयांचा विकास आणि वाचनप्रक्रिया अशा सर्वच बाजूंना हे पुस्तक स्पर्श करते. 'वाचन' ही नेमकी काय गोष्ट आहे, याविषयी हे पुस्तक अधिक काही सांगण्याचा प्रयत्न करते. या पुस्तकाची मांडणी संशोधनात्मक असली, तरी वाचन लेखन या बौद्धिक क्रिया-प्रतिक्रियांविषयींचे अनेक प्रकारचे कुतूहल पूर्ण करण्यात ते यश मिळवते.   मानवी जीवनामध्ये भाषेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. स्वतःचे भाषिक अंग विकसित केल्यामुळे मानव इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला. मानवाव्यतिरिक्त इतर प्राणी हजारो वर्षे मूळ स्वरूपातच आहेत. त्यांनी मानवासारखा भौतिक विकास साधला नाही, याचे कारण 'भाषा' हेच आहे. मानवाने भाषेचा शोध लावला, भाषा अधिकाधिक विकसित केली आणि या भाषेच्या साह्याने स्वतःची प्रगती साधली. वैज्ञानिक प्रगती, मानवी जीवनातील विविधांगी समृद्धता, सर्व क्षेत्रांमधील ज्ञानभांडाराचे संचित भाषेमुळेच मानव प्राप्त करू शकला. हे ज्ञानभांडाराचे संचित भाषेमुळे जतन केले जाते, पुढील पिढीकडे संक्रमित केले जाते; म्हणून मानवी जीवनामध्ये चाकाच्या शोधापेक्षाही भाषेचा शोध महत्त्वाचा मानावा लागतो. परंतु हा शोध सहज-सोपा नव्हता. त्यासाठी माणसाला मोठ्या प्रक्रियेतून जावे लागले आहे यासंदर्भातील संक्षिप्त तरीही रोचक इतिहास माणसाचं व्यक्त होणे' या पहिल्या प्रकरणामध्ये डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी मांडला आहे. भाषेविषयीचे कुतूहल माणसाला नेहमी राहिले आहे. त्यामुळे भाषेच्या निर्मितीचा शोध तो सतत घेत राहिला. या शोधाचा आढावाच येथे वाचता येईल.   मानवाच्या विकासात भाषेला किती महत्त्व आहे, भाषा व बोली म्हणजे काय- यांसारख्या अनेक प्रश्नांना स्पर्श करीत डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी भाषेची काही वैश्विके अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. मानव हा समाजशील प्राणी आहे. समाजाचे अस्तित्व आणि विकासासाठी अविरत कार्यशील असलेली भाषा म्हणूनच मानवी जीवनामध्ये महत्त्वाची आहे. भाषेचे स्वरूप जाणीवपूर्वक समजावून घेतल्याशिवाय तिचे सामर्थ्य आपल्या लक्षात येत नाही. सर्वच मानवी समूहांचा स्वतःच्या भाषेशी घनिष्ठ आणि अतूट संबंध दिसतो. स्वतःच्या भाषेविषयी प्रत्येक समाजाला नितांत आदर असतो. त्यामुळेच भाषेच्या प्रश्नांवर समाज संवेदनशील दिसतो. भाषा प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचा एक भाग असते. समाजाची संस्कृती, परंपरा, श्रद्धा, ज्ञान इत्यादींचे जतन आणि पुढच्या पिढीकडे वहन करण्याचे महत्त्वाचे कार्य

भाषेमार्फत सुरू असते. परंपरेतून चालत आलेल्या आणि संस्कृतीमध्ये अंतर्भूत

वाचन/१६४