पान:वाचन (Vachan).pdf/१६२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


कालांतराने चित्ररूप लेखनाचे लिपीत झालेले रूपांतर, लिपीचा विकास, अरबी, अमेरिकन व आपल्या देशातील लिपींचा सविस्तर तपशील विशद केला आहे.   'ग्रंथनिर्मिती व ग्रंथालय विकास' हे या पुस्तकाचे महत्त्वाचे प्रकरण. यात ग्रंथाची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि विकास यावर लेखकाने विस्ताराने लिहिले आहे. याचबरोबर मुद्रण कलेचा उगम आणि विकासाविषयी साधार विवेचन केले आहे. वाचन पद्धतीविषयी लिहिताना लेखकाने, ‘‘काही पुस्तकांची नुसती चव बघायची, काही गिळायची तर काही चाखत पचवायची' हे फ्रान्सिस बेकनचं विधान उधृत केलं आहे. तर 'How to read Book' या मॉर्टिमर अॅडलर यांच्या पुस्तकात सांगितलेल्या प्राथमिक वाचन, निरीक्षण वाचन, विश्लेषणात्मक वाचन आणि सारभूत वाचन या चारही प्रकारांचा उहापोह केलेला आहे. या दोन्ही संदर्भातून वाचनाची नेमकी दिशा कशी असावी याचा उलगडा होतो. ग्रंथवाचनाच्या विविध पद्धती विशद करून शेवटी ग्रंथालयाचा उगम आणि विकास याविषयीचा तपशील नोंदवला आहे. ‘वाचनः स्वरूप आणि व्याप्ती' हे प्रकरण म्हणजे पुस्तकाचा केंद्रबिंदू. वाचन हा शब्द, त्याचा अर्थ, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती हा सर्व भाषाशास्त्रीय तपशील नोंदवून लेखकाने वाचकांना, 'वाचन हा वेळ घालवायचा छंद नव्हे तर वेळ सत्कारणी लावण्याचा तो सृजनात्मक उपक्रम होय. जी माणसं नियमित वाचन करतात, ती नित्य व्यायामाप्रमाणे रोज अधिक प्रगल्भ होत राहतात' असा मौलिक संदेश दिला आहे. वाचन ही एक कला, एक कृती, एक विज्ञान कशी आहे हे स्पष्ट करून वाचनाचे उद्देश नमूद केले आहेत. वाचन प्रक्रिया, वाचन प्रकार, वाचन वैविध्य, वाचन संस्कृती, वाचनाचे महत्त्व, वाचनाचा उगम आणि विकास, इ-बुक, इ-रिडींग इत्यादी सर्व विवेचन केवळ वाचायचे नसून त्याची सातत्याने पारायणं केली पाहिजेत तरच हे पुस्तक वाचल्याचा आणि समजून घेतल्याचा उत्कट आनंद वाचकांना मिळू शकतो. असे झाले तरच म्हणून वाचनाचा विचार भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर, वर्तमानाचे भान ठेवून, भविष्यवेध घेतच करायला हवा, तरच वाचन संस्कृती टिकेल व भविष्यात ती वर्धिष्णू होत राहील' ही लेखकाची अपेक्षा सार्थ ठरेल.

  पुस्तकाच्या शेवटी जोडलेल्या परिशिष्टांत वाचकांचे हक्क, ग्रंथ सनद, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील सुभाषित संग्रह, वाचन व पुस्तके याविषयी लेखकाची दीर्घ कविता, संदर्भ ग्रंथ सूची आणि विशेषांक सूची यांचा समावेश

वाचन १६१