पान:वाचन (Vachan).pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अभिप्राय - २ वाचनाचा सर्वांगीण वेध घेणारा ग्रंथ   लेखक, समीक्षक, संशोधक, संपादक, अनुवादक, प्रशासक, मार्गदर्शक आणि समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे संवेदनशील व उपक्रमशील व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. सुनीललकुमार लवटे. 'वाचन' हे त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले व लक्षवेधी ठरलेले अभ्यासपूर्ण वाङ्मयीन अपत्य. त्यांनीच मनोगतात म्हटल्याप्रमाणे प्रगल्भ वाचक होण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक. वाचन व्यवहार, प्रक्रिया, स्वरूप, पद्धती अशा अंगाने विचार करून सैद्धांतिक मांडणी करण्याच्या भूमिकेतून डॉ. लवटे यांनी प्रदीर्घ काळ वाचन, चिंतन आणि संशोधन करून याची निर्मिती केली आहे. केव्हा, कुठे, कसे,काय, किती, कसले आणि का वाचन करावे या सर्व प्रश्नांची उत्तरं सापडण्याची सोय व्हावी म्हणून हे लेखन झाल्याचे पुस्तक वाचनात सतत जाणवत राहते.   ‘माणसाचं व्यक्त होणं' या पहिल्या प्रकरणामध्ये माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये अंतर निर्माण करणा-या भाषा, विचार, बुध्दी, अभिव्यक्ती आणि अविष्कार इत्यादी घटकांच्या अनुगने विश्लेषण करून माणसाच्या बोलण्याचा, भाषेचा, बोलीचा उगम केव्हा व कसा झाला याचा शोध घेतला आहे. तर दुस-या प्रकरणात लोकसाहित्याचा उगम आणि विकास यावर प्रकाश टाकताना लोकवाङ्मय आणि लोकसाहित्य या संकल्पना विशद करून लोकगीते, लोककथा,लोकनाट्य, भजन, पोवाडे, उखाणे, वाक्प्रचार, म्हणी इत्यादी प्रकारांचा परामर्श घेतला आहे. 'लेखन विकास' या तिस-या प्रकरणामध्ये प्रागैतिहासिक काळापासूनच्या अभिव्यक्ती कलांचा शोध घेवून स्थलकाल आणि संस्कृतीनुसार

होत गेलेल्या बदलांचा आढावा घेतलेला आहे.

वाचन/१६०